नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेवढे चर्चेत राहात नसतील, तेवढ्या ‘मिसेस मुख्यमंत्री’ अमृता फडणवीस त्यांच्या वक्तव्याने कायमच चर्चेत असतात. साधारण वर्षभरापूर्वी ‘मिसेस मुख्यमंत्र्यां’चा असाच एक किस्सा गाजला. एका मुलाखतीत त्यांनी त्यांचे पती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळ्या खूप आवडत असल्याचे सांगितले. मात्र, नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिसेस मुख्यमंत्र्यां’चे हे वक्तव्य खोढून काढले आहे. त्यामुळे आता घरी गेल्यानंतर काय, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.
एका बैठकीत देवेंद्र फडणवीस किती पुरणपोळ्या खाऊ शकतात असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस आधी ३० ते ३५ पुरणपोळ्या सहज पातेलाभर तुपासोबत खायचे असे सांगितले.
त्यानंतर अमृता फडणवीस यांना पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला. लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती होती. त्यावर त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणविसांना ३० ते ३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची आणि त्या सुद्धा मी बनवलेल्या. या मुलाखतीनंतर जिथेतिथे देवेंद्र फडणवीसांना पुरणपोळीच खायला दिली जात होती.
त्यामुळे घरी आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकदा अमृता फडणवीसांना अखेर विचारलेच. ‘तु असे काय बोललीस, की लोक मला जिथेतिथे पुरणपोळी खायला देतात’. हा प्रकार थांबवण्यासाठी अखेर अमृता फडणवीसांना स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘एका पैजेत फडणविसांनी ३० ते ३५ पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या, माझ्यापुढे त्यांनी एकही पुरणपोळी खाल्ली नाही’.
मात्र, पुरणपोळीचा हा किस्सा गाजला तो गाजलाच. आताही जिथेकुठे खाण्याचा विषय निघतो, तिथे पुरणपोळीचा विषय निघतोच. आजदेखील दिवाळी मिलन कार्यक्रमात पुरणपोळी होतीच आणि शेवटी तो किस्सा पुन्हा निघालाच.
एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, की पुरणपोळी व्यतिरिक्त तुम्हाला काय आवडते? त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितले. मुळातच मला पुरणपोळी आवडत नाही. त्यामुळे पुरणपोळी खाण्याचा प्रश्नच येत नाही. एक मात्र नक्की मी ‘डार्क चॉकलेट’चा दिवाना आहे. गोडातली ती माझी आवडती डीश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमृता वहिनीला तोंडघडी पाडल्याची चर्चा पत्रकारांमध्ये रंगली.
आता घरी गेल्यानंतर ‘मिसेस मुख्यमंत्र्यां’ची प्रतिक्रिया काय असणार, अशीही चर्चा सुरू झाली. पुरणपोळीमागील नेमके कथानक काय, हे सर्वांना माहिती असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुरणपोळी हे समीकरण काही वेगळे व्हायला तयार नाही.