लोकसत्ता टीम

अकोला : अकोट नगरपरिषद क्षेत्रातील वराहांमध्ये ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. त्यानुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉ. शरद जावळे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला.

अकोट शहरात वराह मृत होत असल्याचे आढळल्यावरून नमुने भोपाळ येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज’ यांना पाठविण्यात आले. त्याचा अहवाल होकारार्थी आला आहे. आदेशानुसार, संक्रमणस्थळाच्या एक किलोमीटर परिघातील क्षेत्र संनियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करून त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्याचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश आहेत. या क्षेत्रात सक्रिय संनियंत्रण व्यापक प्रमाणात व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात.

आणखी वाचा-गडचिरोलीत राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने दारू तस्करी? सीमाभागातील बार आणि दुकाने मुख्य केंद्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वराहाच्या मांसाची विक्री करणाऱ्या आस्थापनांची नोंदणी पूर्ण करून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेटी देऊन नियंत्रण ठेवावे. मोकाट पद्धतीने होणारे वराहपालन टाळावे. घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे हे विषाणूच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरते. ते टाळावे, तसेच निरोगी वराहाचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये. वराहपालन केंद्रातील तसेच मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये. सर्व कचरा नष्ट करावा किंवा सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्तदृष्ट्या त्याची विल्हेवाट लावावी. वराहपालन करणारे पशुपालक व या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींमध्ये जागृती करावी. शेजारच्या राज्यातील वराहांचा अनधिकृत प्रवेश होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने पोलीस व तपासणी नाक्यांशी समन्वय ठेवावा, असे आदेशात नमूद आहे.