नागपूर: राष्ट्रवादीचा गड असलेल्या काटोल मतदारसंघातील नरखेड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी जिंकली असली तरी कधीकाळी देशमुख यांचे कार्यकर्ते असणाऱ्याच्या ‘सतरंजी’ गटाने सेवा सहकारी गटात मारलेली मुसंडी देशमुख यांची या क्षेत्रातील एकाधिकारशाही मोडून काढणारी ठरली आहे. नरखेड खरेदी विक्री संघासाठी शनिवारी निवडणूक पार पडली, ११ पैकी ८ जागा जिंकून अनिल देशमुख गटाने बाजी मारली. पण या निवडणुकीच्या निमित्ताने घडलेले राजकारण निवडणूक निकालापेक्षा अधक महत्त्वाचे आहे.

खविसच्या निवडणुका ४५ वर्षानंतर प्रथमच झाल्या. देशमुख गटाने खविस आपल्याकडेच राहावी म्हणून मतदार नोंदणीपासून सर्व काही केले. आपल्याला कोणी आव्हानच देऊ नये, दिले तरी ते मोडून काढता येईल, याची व्यवस्था  केली. उमेदवार ठरवतानाही त्यांनी गोतावळ्याला प्राधान्य दिले. त्यामुळे देशमुख यांचे निष्ठावंत नाराज झाले. आम्ही वर्षानुवर्षे फक्त सतरंजीच उचलायची का?  असा सवाल करून त्यांनी वेगळी चूल मांडली. त्यांना भाजप, कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने साथ दिली. त्यामुळे ही निवडणूक सतरंजी गट विरुद्ध अनिल देशमुख गट अशी झाली. सेवा सहकारी आणि शेतकरी या दोन्ही गटात आपणच वर्चस्व प्रस्थापित करू असा दावा देशमुख गटाकडून केला जात होता.

हेही वाचा >>> “२००० ची नोट बंद करण्याचे कारण…” मुनगंटीवार म्हणाले, “विरोधकांनी…”

खुद्द अनिल देशमुख प्रचाराला उतरले होते. मतदानाच्या दिवशी दिवसभर देशमुख निवडणूक केंदावर उपस्थित होते. त्यानंतरही सेवा सहकारी गटातून देशमुख यांना एकही जागा जिकता आली नाही, तीनही जागा सतरंजी गटाने जिंकल्या. तीनपैकी लोकेश काळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते त्यांनी उमेदवारी मागितली होती. देशमुख यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली व विजयी झाले. या गटातील इतर दोन विजयी उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. शेतकरी गटातील सर्वच म्हणजे आठ जागा देशमुख गटाने जिंकल्या. त्यामुळे त्यांना खविसवर झेंडा फडकवता आला. पण सतरंजी गटामुळे त्यांच्या तोंडाला चांगलाच फेस आणला.