वर्धा : लोकांची सोय, हा कोणत्याही प्रशासकीय निकषाचा आरंभ. लोकशाही व्यवस्थेत सामान्य नागरिकांस शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणारे शासन सर्वोत्तम, असेही म्हटल्या जाते. पण एक गाव असेही आहे की ज्यास स्वातंत्र्यापासून आजतागायत हेलपाटे घालणेच नशिबी आले आहे. पोलीस, न्यायालय व प्रशासन तीन टोकाला. त्याचीच ही व्यथा. पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी ती ऐकली आणि चकित झाले.

आंजी मोठी म्हणून परिचित असलेले हे व्यथाग्रस्त गाव. प्रशासकीयदृष्ट्या ते वर्धा तालुक्यात म्हणजे वर्धा मतदारसंघात. पण मतदान करावे लागते ते देवळी मतदारसंघात. आणि पोलीस व न्यायालयासाठी जावे लागते आर्वी मतदारसंघात. आंजी जिल्हा परिषद प्रभागात २५ हजार लोकसंख्येचा तर लगत आहेत ४० गावे. हे सर्व गावकरी तीन मतदारसंघात वर्षभर फिरत असतात. मोठी अडचण पोलीस व न्यायालयीन सेवेची. गावच्या लोकांना पोलीस तक्रार व अन्य पोलीस मदतीसाठी आर्वी तालुक्यातील खरांगना पोलीस ठाणे गाठावे लागते. तर पुढे त्यातून उद्भवणाऱ्या न्यायालयीन खटल्यासाठी आर्वी न्यायालयाचे उंबरठे झिझवावे लागतात. शिवाय आंजी लगतच्या काही गावांचे वेगळेच त्रांगडे. म्हणजे काही गावांना वर्धेलगत सेवाग्राम व सावंगी पोलीस ठाण्यात जावे लागते. तर काहींना सेलू पोलिसांत.

या जि. प. प्रभागाच्या माजी सदस्य व माजी जि. प. सभापती जयश्री गफाट सांगतात की अनेक वर्षांपासून गावकरी किमान एक पोलीस स्टेशन आंजीत स्थापन करण्याची मागणी करीत आहे. दारूबंदी करणाऱ्या तसेच व्यसनी नवऱ्याच्या त्रासास कंटाळून दुःखी होणाऱ्या महिला आहेत. त्यांना पायपीट करीत २०, २५ किलोमीटरवर जात तक्रार करावी लागते. ही गंभीर बाब असून अनेकांसाठी जीवावर बेतू शकते. म्हणून पोलीस ठाण्याची बाब मार्गी लागली पाहिजे. गावात आरोग्य व अन्य सुविधा बऱ्या पैकी उपलब्ध आहेत. मात्र प्रशासकीय खोळंबा कटकटीचा.

पालकमंत्री डॉ. भोयर हे नुकतेच या आंजीत एका कार्यक्रमास गेले असतांना त्यांना हे गाऱ्हाणे ऐकावे लागले होते. त्याचा संदर्भ ठेवून गावचे रहिवासी व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे सहकारी सोबत घेत पालकमंत्र्यांना वर्ध्यात भेटले. ४० गावातील जवळपास ५० हजार लोकांचा हा प्रश्न आहे. आंजीत पोलीस ठाणे लवकर स्थापन व्हावे. तसे झाल्यास संबंधित लोकांना केसेससाठी वर्धा न्यायालयात दाद मागता येईल. गावातील अनुचित प्रकार टळतील. अन्य पोलीस ठाण्यात जाण्याचा खर्च व वेळ वाचू शकतो. त्यावर पालकमंत्री भोयर यांनी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याची सूचना केली आहे. सुनील गफाट म्हणतात की पोलीस अधीक्षक जैन यांनी यासाठी चर्चा करण्यास बोलावले असून मार्ग निघेल अशी आता खात्री वाटत आहे.