भंडारा : आयुध निर्माण कारखान्यापासून ३०० मीटर अंतरावर असलेले साहुली गाव. इतर गावांप्रमाणे या गावाला देखील स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. भूकंपाप्रमाणे धक्केच या गावाने सोसले. मात्र यापेक्षा गंभीर धक्का होता तो वीस वर्षीय तरुण अंकित बारईच्या मृत्यूचा. त्याच्या मृतदेहाला पाहताच त्याच्या वडिलांनी एकच आक्रोश केला. मुलाला परत ये अशी आर्त हाक देत ते बेशुध्द पडले.

बारावीचा निकाल लागल्यानंतर सहा-सात महिन्यांपूर्वीच अंकित कारखान्यात लागला होता. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी त्याचे मातृछत्र हरपले. घरात वडील, मोठा भाऊ आणि अविवाहित बहीण. वडील तीनही लेकरांचा सांभाळ करायचे. मात्र शेंडेफळ असल्याने अंकित जास्त लाडाचा. मृत अंकिची बहीण तिच्या मैत्रिणीजवळ धाय मोकलून रडत होती. वडिलांना त्याच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसला होता. थोडा थोडा वेळात ते बेशुद्ध होत होते.

अंकित गेल्याचे कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. आज गावकरी जवाहर नगर येथे एकवटले. साहुली हे गाव १३०० वस्तीचे. सुमारे अडीचशे कुटुंबाची ही वस्ती. बहुतांश कुटुंबाची शेती. कारखाना वसला त्यावेळी त्यात शेती गेली. यापूर्वी देखील या कारखान्यात एक मोठी अन् गेल्या वर्षीच एक लहान घटना घडली. त्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ गावाचे स्थलांतर करण्याची मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. कारणही तसेच. बारई कुटुंबाप्रमाणे गावातील अनेक रहिवाशांचे पोट या कारखान्यावर अवलंबून आहे. प्रत्यक्ष कारखान्यात काम करीत असल्याने येथील धोके गावकरी अधिक जाणून आहेत. काल सकाळी झालेल्या स्फोटानंतर काहींच्या घरावरील टिनाचे पत्रे हलले, काहींच्या घरावरील कवेलू कोसळले तर काहींच्या भिंतीला भेगा पडल्या. गावात भेट दिली असता अर्धे अधिक ग्रामस्थ घटनेच्या पाच तासानंतरही घराबाहेरच होते.

‘सांत्वन नको न्याय द्या’…

मृत अंकितला न्याय मिळावा आणि गावाचे पुनर्वसन व्हावे या मागण्यांसाठी कुटुंबीयांसोबतच गावातील महिला, पुरुष आणि लहान मुले मोठ्या संख्येने जवाहर नगर परिसरात जमले. ४.१५ पर्यंत अंकितचा मृतदेह कारखान्याच्या मुख्यद्वरावर ठेवून ठिय्या मांडला. सांत्वन नको न्याय द्या, अशी महिलांनी जोरदार नारेबाजी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगण्याचा आधारच गेला

एका अपघातात पत्नीला काही वर्षापूर्वी गमावल्यानंतर अंकितच्या वडिलांनी लहान मुलाला गमावले. वडील मजुरी तर मोठा भाऊ घरची अर्धा एकर शेती पाहतो. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची. दरमहा निश्चित अशी मिळकत ही अंकितचीच होती. त्याच्याच कमाईतून कुटुंबाचे पोट भरत होते. अंकित नोकरीला लागल्यामुळे मोठा भाऊ आणि बहिणीसाठी स्थळ पाहणेही जोरात सुरू होते. पण, अवघ्या सहा-सात महिन्यामध्येच कुटुंबाची आशा संपुष्टात आली.