नागपूर : दिवाळी व छठ पर्वाच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची पूर्तता करण्यासाठी मध्य रेल्वेने नागपूर-हडपसर (पुणे) – नागपूर दरम्यान आठवड्यातून दोन सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०१२०१ नागपूर–हडपसर सुपरफास्ट विशेष गाडी प्रत्येक सोमवार व गुरुवारी नागपूरहून रात्री ७.४० वाजता निघेल आमि दुसऱ्या दिवशी (मंगळवार व शुक्रवार) सकाळी ११.२५ वाजता हडपसर येथे पोहोचेल. ही गाडी २९ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत धावणार आहे.

गाडी क्रमांक ०१२०२ हडपसर–नागपूर सुपरफास्ट विशेष गाडी प्रत्येक मंगळवार व शुक्रवार हडपसरहून दुपारी ३.५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी (बुधवार व शनिवार) सकाळी ६.३० वाजता नागपूर येथे येईल. ही गाडी ३० सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आठवड्यातून दोनदा धावेल.

या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, ऊरळी, पुणे जं. थांबे आहेत. ही गाडी १८ डब्यांची असेल आणि त्यात चार एसी ३-टियर, सहा स्लिपर, सहा सर्वसाधारण व २ द्वितीय श्रेणी सामान व गार्ड ब्रेक व्हॅन असतील.

नागपूर आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस देखील धावते. ही एक्स्प्रेस देशातील सर्व वंदे भारत गाड्यांमध्ये सर्वाधिक अंतर पार करणारी ठरली असून ती नागपूर ते पुणे हे अंतर अवघ्या १२ तासांत पूर्ण करणार आहे. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड या स्थानकांवर थांबते. प्रवाशांच्या वेळेची बचत आणि प्रवासाचा आराम लक्षात घेता ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

याचबरोबर, नागपूर-पुणे प्रीमियम ट्रेनही ६ ऑगस्टपासून नियमितपणे सुरू झाली आहे. रेवा ते पुणे (हडपसर) दरम्यान धावणाऱ्या २०१५२/५१ साप्ताहिक एक्सप्रेसची चाचणी पूर्ण झाली असून ती अजनी आणि हडपसर दरम्यान प्रवास करते. ही ट्रेन पुण्याहून सकाळी ६.२० वाजता निघते आणि अजनीला सायंकाळी ६.२० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती अजनीहून सकाळी ९.२० वाजता निघून पुण्याला रात्री ९.३० वाजता पोहोचते. नागपूर–पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रमुख रेल्वेगाड्या अशा आहेत. वंदे भारत एक्सप्रेस, नागपूर–पुणे एक्सप्रेस सुपरफास्ट, महाराष्ट्र एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, दुरान्तो, पुणे-अजनी एक्सप्रेस आहेत.