२५ वर्षांपूर्वी भारतात ८० टक्के लोक ग्रामीण भागात राहात होते, परंतु, आज हे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. शेती परवडत नसल्याने लोक शहराकडे स्थलांतर करीत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. वनामती सभागृहात ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट’च्या चर्चासत्रात गडकरी बोलत होते.

शेती फायद्यात यावी यासाठी त्यावरील उत्पादन खर्च कमी करावा लागेल. त्याचा अभ्यास इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटने करावा. अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचेही अंकेक्षण व्हावे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, देशाचे कृषी क्षेत्र दुर्लक्षित आहे. २५ वर्षांपूर्वी भारत ८० टक्के कृषी प्रधान होता. आता हे प्रमाण ६५ टक्क्यांवर आले आहे. ग्रामीण भागातील स्थलांतर वाढले. शेती परवडत नाही. ती फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून ते कठीण नाही. शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. भारतात पाणी आहे पण त्याचे नियोजन नाही, हे सांगताना गडकरी यांनी ते जलसंपदा मंत्री असताना या क्षेत्रात केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी नदीजोड करण्याचे ४८ प्रकल्प तयार केले. हे प्रकल्प खासगी-सरकारी भागीदारीतून करता येईल का यावर विचार व्हावा. वास्तविक शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरने पाणी दिले तर उत्पादन अडीच पट वाढते. पाण्यामुळे सामाजिक आर्थिक परिवर्तन होऊ शकते. शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात वाढ होणे, मालवाहतूक खर्च कमी होणे, ड्रोनच्या साह्याने फवारणी करणे, इथेनॉलसारख्या जैविक इंधनाचा वापर करणे आदी पर्यायांकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.