अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात तब्बल १.१८ लाख प्रवाशांनी मे महिन्यामध्ये अनधिकृत प्रवास केला. त्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारत मध्य रेल्वेने ११.१९ कोटींचा महसूल जमा केला आहे. फुकट्या प्रवाशांमुळे नियमित व अधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या विरोधात रेल्वेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
रेल्वे स्थानकांवर व गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश व अनियमित प्रवास रोखण्यासाठी भुसावळ विभागात सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते. प्रवाशांना आरामदायक प्रवास अनुभव मिळावा, यासाठी मेल, एक्स्प्रेस, सुट्टी विशेष व पॅसेंजर गाड्यांमध्ये व्यापक तिकीट तपासणी करण्यात येत आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकिट तपासणी) पी. के. सिंह यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली.
मे २०२५ मध्ये तिकीट तपासणी क्षेत्रात भुसावळ विभागाने उल्लेखनीय कार्य केले. विभागातील विविध गाड्यांमध्ये सातत्यपूर्ण तपासणी मोहीम राबवून विनातिकीट प्रवास, अनियमित तिकीट व प्रवास नियमांचे उल्लंघन यावर कठोर कारवाई करण्यात आली. या उपक्रमामुळे महसुलात मोठी वाढ झाली असून प्रवाशांमध्ये शिस्तबद्ध प्रवास संस्कृतीला चालना मिळाली आहे.
मे महिन्यात एकूण एक लाख १८ हजार अनधिकृत प्रवास प्रकरणांवर कारवाई करत भुसावळ विभागाने तिकीट तपासणीद्वारे विक्रमी ११.१९ कोटींचे महसूल मिळवला. यामध्ये अनियमित प्रवासाच्या ४८ हजार ३६७ प्रकरणांतून ३.१३ कोटी, विनातिकीट प्रवासाच्या ७० हजार ३२९ प्रकरणांतून ८.०५ कोटी व विनाबुकिंग सामानाच्या १०१ प्रकरणातून २३ रुपयांच्या दंड रक्कमेचा समावेश आहे. योग्य आणि वैध तिकिटांसहच प्रवास करावा, त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय सुलभ प्रवासाचा अनुभव घेता येईल. तिकीट तपासणीच्या विशेष मोहिमेमुळे रेल्वे गाड्यांमधील नियमबाह्य प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे योग्य तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही, असे रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उधना-खुर्दा रोड साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवल्या
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन गाडी क्र. ०९०५९/०९०६० उधना-खुर्दा रोड (साप्ताहिक) विशेष गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या संरचनेत, वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा मार्गामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.