अकोला : आकाशात सूर्य विषुववृत्ताकडून कर्कवृत्ताकडे सरकतांना आपले तापमानाचे नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणात घडून येणारे बदल दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत. रणरणत्या उन्हाचा ताप कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी ग्रह तारे आपल्या सोबतीला येऊन काहीसा दिलासा देतात. अशाच प्रकारचा विविधरंगी प्रकाश उत्सव अर्थात आकाश दिवाळी स्वरमंडळ तारका समूहातून २१ व २२ एप्रिलच्या रात्री पूर्व आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. त्याचा आनंद घेण्याचे आवाहन खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
विविध रंगाच्या उल्का त्यांचे वस्तू कणांमधील घटकांनुसार रंग बदलतात. लोह खनिजाची पिवळसर, मॅग्नेशियमची निळ्या, सोडियमची नारिंगी, कॅल्शियमची गुलाबी तर नायट्रोजन व ऑक्सिजनयुक्त लाल रंगाचे स्वरूपात दिसणारा हा प्रकाश नजारा दरताशी सुमारे वीस या प्रमाणात रात्री ११ नंतर पूर्व क्षितिजावर सुरू होऊन पहाटे आकाश मध्याशी असतांना त्यांचा वेग वाढलेला असेल. याच वेळी पहाटे पूर्व आकाशात शुक्र, शनी आणि बुध ग्रह सुद्धा पाहता येतील. अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल, असे प्रभाकर दोड म्हणाले.
जागतिक वसुंधरा दिनाचे निमित्ताने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक ते कार्य अधिक गतीने सुरू ठेवण्याची गरज आहे. निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन समतोल अबाधित ठेवून आकाशातील विविध घटनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तारा तुटणे म्हणजे उल्का; धूळीकणांचा कचरा गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर रात्रीच्या आकाशात दिसणारा तारा तुटणे म्हणजे उल्का असते. उल्का म्हणजे अवकाशात फिरणाऱ्या छोट्या खगोलीय वस्तू जी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपते.
उल्कांना अशनी असेही म्हणतात. लहान-मोठे लघुग्रह आणि धूमकेतूंनी त्यांच्या मार्गामध्ये सोडलेला धूळीकणांचा कचरा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर येतो. पृथ्वीवर पडण्यापूर्वीच वातावरणामध्ये घर्षणाने ते जळून जातात. आकाराने मोठ्या असलेल्या उल्का जेव्हा पृथ्वीवर पडतात तेव्हा त्यांच्या प्रकाशाचा मोठा झोत दिसतो. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात. उल्कांच्या मोठ्या संख्येने पडण्याला उल्का वर्षाव म्हणतात. उल्कापिंड, विशेषतः सूक्ष्म उल्कापिंड नावाचे सूक्ष्म कण, संपूर्ण सौर मंडळात अत्यंत सामान्य आहेत. ते खडकाळ आतील ग्रहांमध्ये तसेच बाह्य ग्रह बनवणाऱ्या वायू राक्षसांमध्ये सूर्याभोवती फिरतात, असे सांगण्यात आले.