नागपूर: पाऊस आणि पक्षी यांचे नाते अजरामरच! कावळ्याने त्याचे घरटे किती उंचावर बांधले यावरून पाऊस किती पडेल याचा अंदाज अजूनही शेतकरी बांधतो. ‘पावश्या’ या पक्ष्याचा आवाजच मुळात ‘पेरते व्हा..पेरते व्हा..’ असा येतो आणि मग शेतकरी पेरणीला लागतात. चातकाचा आवाज कानी पडला की एक वेगळा उत्साह संचारतो. याच मान्सूनचा जोर वाढतो तेव्हा पक्ष्यांची वीण अधिक घट्ट आणि समृद्ध होऊ लागते. डॉ. तुषार अंबाडकर यांनी पाऊस आणि पक्ष्यांचे असेच नाते टिपले आहे.

केवळ शेती आणि शेतकरीच पावसाची वाट पाहत नाहीत, तर पक्ष्यांसह संपूर्ण निसर्ग पावसावर अवलंबून असतो. स्वर्गीय नर्तक, सुगरण, शिंपी, वटवट्या, नवरंग, तितर, मोर, पिवळ्या गालाची टिटवी, चातक, कोतवाल, सिरकीर मलकोहा, खंड्या, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू, काश्मिरी नीलकंठ, नीलकंठ, हुदहुद, राखी धनेश, मलबारी धनेश, सुतार, चंडोल अश्या अनेक पक्ष्यांचा विणीचा काळ हाच आहे. उन्हाळा संपायला सुरवात होणार आणि मग मान्सूनचा पाऊस कोसळणार या विश्वासाने दरवर्षी हे सर्व पक्षी आपल्या जोडीदारासोबत तर कधी एकटेच घरटी तयार करतात. आपली पुढची पिढी पाऊस आला की येणार, या स्वप्नात रंगून जीव लाऊन मेहनत करतात.

हेही वाचा… सत्ताधारी पक्षाचेच आमदार शासनाविरोधात आंदोलन करणार, कारण काय वाचा…

बुलबुल, कस्तूर, कांचन, निळ्या शेपटीचा वेडा राघू तर जीवाचा आकांत करून पोट भरून नुसते खाताना दिसतात. ‘पल्लवपुच्छ कोतवाल’ पक्ष्याची जोडी मेळघाट जंगलाच्या वृक्षराजीत आपली पुढील पिढी घडविण्याचा स्वप्नात गुंग होऊन काटक्या आणि मऊ गवताचे तुकडे जमा करून घरटे तयार करीत आहेत. जमिनीपासून अंदाजे २० ते २५ फुट उंच झाडाच्या फांदीवर कपबशीच्या आकाराचे याचे घरटे असते. उत्तरेकडून ‘नवरंग’ पक्ष्यांचे आगमन झाले असून हा पक्षी देखील नदी किंवा नाल्याच्या ठिकाणी आडोशाच्या झुडपांमध्ये सध्या घरटी करण्यासाठी जागा शोधत आहे.

पक्ष्यांना पावसाची आतुरतेने वाट, कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन पिढी घडविण्यासाठी मादी व नराला भरपूर उर्जा लागते. तसेच अंडी दिल्यानंतर पिल्लांना पण भरपूर खाद्य भरवावे लागते. मान्सूनच्या पावसाने वातावरण आल्हाददायक होते. उन्हात काही पक्ष्यांची अंडी जास्तकाळ तग धरु शकत नाही. तर काही पिल्लांना तापमान सहन होत नाही. म्हणूनच काही पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहतात, असे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक यादव तरटे पाटील सांगतात.