काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या राज्यसभा यादीवर तीव्र आक्षेप घेतलाय. यात उत्तर प्रदेशमधून इम्रान खान उर्फ प्रतापगडी, पी. चिदंबरम आणि प्रमोद तिवारी यांच्या उमेदवारीवर त्यांनी विशेष आक्षेप घेतले. इम्रान प्रतापगडी यांचं एकच क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे ते कव्वाल आहेत, शायर आहेत आणि मुशायरे करतात, असं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं. यावरूनच त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव घेत काँग्रेस नेत्यांना कव्वाली, शायरी, मुशायरे शिकवावेत, अशी घणाघाती टीका केली. ते मंगळवारी (३१ मे) नागपूर येथे एबीपी माझाशी बोलत होते.

आशिष देशमुख पुढे म्हणाले, “इम्रान प्रतापगडी यांचं एकच क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे ते कव्वाल आहेत, शायर आहेत आणि मुशायरे करतात. म्हणून शिर्डीतील प्रदेश काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात एक वर्कशॉपमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना कव्वाली करणं, शायरी करणं आणि मुशायरी करणं शिकवण्यात आलं पाहिजे. ते शिकवण्यासाठी इम्रान प्रतापगडी महाराष्ट्रात आले तर नक्कीच आनंद होईल.”

“इम्रान प्रतापगडी यांचं २०१९ लोकसभेत डिपॉझिट जप्त”

“इम्रान प्रतापगडी यांचं २०१९ मध्ये मुरादाबाद लोकसभेत काँग्रेसचा उमेदवार म्हणून डिपॉझिट जप्त झालंय. हे महाशय साडेसहा लाख मतांनी हरले आहेत. आता त्यांची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातील ४४ काँग्रेस आमदारांनी त्यांना निवडून द्यावं आणि राज्यसभेवर पाठवावं. जेणेकरून ते राज्यसभेत उभे राहून मुशायरे करतील, कव्वाल्या करतील आणि शायरी करतील,” असं म्हणत आशिष देशमुख यांनी इम्रान प्रतापगडी यांच्यावर टीका केली.

“दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेचं आश्वासन दिलं होतं”

आशिष देशमुख यांनी भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा पक्षश्रेष्ठींकडून काही आश्वासन दिलं होतं का या प्रश्नावर आशिष देशमुख म्हणाले, “दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आश्वासन दिलं होतं. मी १५ दिवसांपूर्वी देखील भेटलो होतो तेव्हा देखील त्यांनी दिलेलं आश्वासन लक्षात आहे, काळजी करू नका असं म्हटलं होतं.”

“एका नवख्या आणि बाहेरील उमदेवाराला महाराष्ट्रावर लादलं”

“असं असताना देखील एका नवख्या आणि बाहेरील उमदेवाराला महाराष्ट्रावर लादण्याचं काम झालंय. या संबंधात सोनिय गांधींवर इतर कोणाचा दबाव होता का, या दबावाखाली असे अनेक निर्णय चुकत चालले आहेत. पक्षाची हानी होत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“२ आमदार निवडून आलेल्या उत्तर प्रदेशातून ३ नेते राज्यसभेवर”

आशिष देशमुख म्हणाले, “महाराष्ट्रातील एखाद्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अजून बळकटी देण्यासाठी मदत झाली असती. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे केवळ दोन आमदार निवडून आले आणि तेथील तीन जणांना राज्यसभेवर पाठवलं जात आहे.”

हेही वाचा : काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर! आशिष देशमुख राजीनामा देणार; कारण सांगताना म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्रातही काँग्रेसची उत्तर प्रदेशप्रमाणे परिस्थिती करायची आहे का?”

“या निर्णयामुळे माझ्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो की उत्तर प्रदेशमध्ये जी काँग्रेसची परिस्थिती आहे तशी परिस्थिती महाराष्ट्रात करायची आहे का? यासाठी कट रचला जात आहे का हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांसमोर आहे,” असंही देशमुख यांनी म्हटलं.