नागपूर : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे एकत्र येण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोघांचा एकत्रित फोटोही समाज माध्यमांवर शेअर केला. त्यामुळे हे दोघे एकत्र येण्याच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. दोघे एकत्र येण्यावरून भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार टीका होत आहे.

दोघा भावांच्या वाढत्या गाठीभेटीमुळं अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. भाजपसह सर्व पक्ष याकडं लक्ष ठेवून आहेत. एकेकाळचे शिवसैनिक आणि आणि शिंदे सेनेच्या मंत्रिमंडळात असलेले राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दोघेही भाऊ एकत्र आले तरी ॲडजेस्टमेंटवरून पुन्हा वाद उफाळणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.

आशिष जयस्वाल पाच टर्मचे आमदार आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात जयस्वाल यांनीच शिवसेनेला खाते उघडून दिले होते. अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सुद्धा गेले. पुन्हा निवडणूक आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. गडचिरोली जिल्ह्याचे ते सहपालकमंत्री आहेत. सुमारे पंचवीस वर्षांपासून शिवसेना आणि उद्धव व राज ठाकरे यांच्या कामाचा व कार्यशैलीचा त्यांना चांगलाच अनुभव आहे.

दरम्यान, दोन्ही बंधू एकत्र आल्यास काय राजकीय परिणाम होईल? अशी विचारणा केली असता जयस्वाल म्हणाले, ते अद्याप एकत्र आले नाहीत. उद्धव व राज ठाकरे यापैकी कोणीच तडजोड करीत नाहीत. त्यामुळे दोघे भाऊ वेगवेगळे झाले होते. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच थोडी लवचिकता दाखवली असती किंवा सामंजस्याची भूमिका घेतली असती तर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले नसते. आता एखाद्या निवडणुकीसाठी एकत्र आले तरी त्यांची भूमिका एकच राहील, एकमेकांना सांभाळून घेतले जाईल असे वाटत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी तो त्यांचा निर्णय आहे असेही जयस्वाल म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबतच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीला मतविभाजानाचा धोका नाही असे सांगून त्यांनी ठोकरे बंधूंच्या युतीने भाजप महायुतील फरक पडणार नसल्याचे सांगितले. असे असले तरी भाजप आणि मित्र पक्षांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरून विविध चर्चा रंगली आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुका संदर्भात चिंता ही व्यक्त केली जात आहे.