नागपूर: रविवारी १४ सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. या सामन्यावरुन सध्या भारतात मोठा गदारोळ झाला. आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरुन विरोधकांकडून सरकारवर टीका झाली. या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला होता. भारत पाकिस्तान सामना ही देशभक्तीची थट्टा आहे. देशभक्तीचा व्यापार सुरू आहे. त्यांना व्यापारापुढे देशभक्तीचे काही पडले नाही, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर आता भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे केवळ राजकारण करत असून त्यांचे सर्व आरोप अतार्कीक आणि अप्रासंगिक असल्याचा आरोप त्यांनी केला. नागपूर दौरा दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आशिष शेलार म्हणाले, मला असे वाटते की, भारतातल्या जनतेला केंद्र सरकारचा निर्णय पूर्णता कळलेला आहे. ही भारत पाकिस्तान दौरा किंवा भारत पाकिस्तान सामना नव्हे. भारत सरकार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचसाठी प्रस्ताव देणारी नाही, तर कधीही प्रस्ताव मान्य करणार नाही. काल झालेली मॅच ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भाग होता. एका आंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताने खेळू नये अशी भूमिका भारतवासीयांची नाही. ऑपरेशन सिंदूर आणि त्या माध्यमातून आतंकवाद्यांना आपल्या सैनिकांनी संपवून टाकल. हे आपल्या भारतीय सैनिकांचे कर्तुत्व आहे. काल मॅच जिंकल्यानंतर सुद्धा भारतीय कर्णधार सूर्या यांनी हा विजय देशाच्या जनतेचा आहे. भारतीय सैनिकांना त्याने हा विजय अर्पण केला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळू नये अशी भारतीयांची भूमिका नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी क्रिकेट सामन्यावरून केलेला आरोप अतार्किक आहे असे शेलार म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे झाले तर जिथे जिथे पाक नाव त्याला त्यांचा विरोध असेल. उद्यापासून उद्धव ठाकरे आले पाक पण खायचे बंद करतील असेही शेलार म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

आशिया कप २०२५ मध्ये आज रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र, या सामन्याविरोधात राज्यात तीव्र संताप पाहायला मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यभर ‘माझे कुंकू माझा देश’ या आंदोलनाद्वारे या सामन्याचा तीव्र विरोध करत आहे. पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात देशभर संतापाची लाट उमटली आहे. भारत आणि पाकिस्तान सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. भारताविरुद्ध सतत दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय क्रिकेट संघाने सामने खेळू नये. यासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. तसेच राज्यभर आंदोलनाचे आव्हानही करण्यात आले होते.