नागपूर : सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर भारताचे ५२ वे सरन्यायाधीश बनणार आहेत. बुधवारी १४ मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींनी मंगळवारी आपली संपत्ती सार्वजनिरित्या जाहीर केली. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही शपथ घेण्याचा एक आठवड्यापूर्वी त्यांची संपत्ती सार्वजनिक केली आहे. न्या.भूषण गवई यांच्याकडे विदर्भाच्या विविध जिल्ह्यांमध्ये भरपूर संपत्ती आहे.

कुठे कुठे संपत्ती?

सर्वोेच्च न्यायालयाच्या संकेतस्थळानुसार, न्या.गवई यांच्याकडे अमरावती येथे पैतृक निवास आहे. वडिलांच्या मृत्युनंतर हे निवास त्यांच्या नावावर झाले आहे. याशिवाय त्यांच्याकडे मुंबईमध्ये बांद्रा येथे घर आहे. दिल्लीमधील डिफेन्स कॉलनीमध्ये त्यांच्या नावावर घर आहे. अमरावतीमध्ये दोन ठिकाणी त्यांच्या नावावर शेती आहे. नागपूरच्या काटोल तालुक्यातही त्यांच्या नावावर कृषी जमिन आहे. भावी सरन्यायाधीशांच्या नावे बँकेत १९ लाख ६३ हजारांच्या ठेवी तर पीपीएफ खात्यात ६ लाख ५९ हजार रुपये आहेत. न्या.गवई यांच्याकडे सुमारे पाच लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे आहेत.

त्यांच्या पत्नीकडे ७५० ग्राम सोने असून त्यांची एकूण किंमत सुमारे तीस लाख रुपये आहे. ६१ हजार ३२० रुपयांची रोख रक्कमही त्यांच्याकडे आहे. तसेच, तब्बल १ कोटी ३० लाखांचं कर्ज त्यांच्या नावावर आहे. न्या. एम. हिदायतुल्लाह आणि न्या. शरद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचा आणखी एक सदस्य न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर असेल. न्या. भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. १९९० मध्ये बॅरिस्टर राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबईत वकिलीला सुरुवात केली आणि नंतर ते नागपूरला स्थायिक झाले. २००३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी गवई नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकील होते आणि त्यांनी राज्य, विद्यापीठे, नगरपालिका, सार्वजनिक उपक्रम इत्यादींचे प्रतिनिधित्व केले होते.

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची संपत्ती किती?

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानावे बँकेत ५५ लाख ७५ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट आणि १ कोटी ६ लाख रुपयांचा पीपीएफ आहे. याशिवाय, सरन्यायाधीश खन्ना यांच्यानावे दक्षिण दिल्लीत २ बीएचके डीडीए फ्लॅट असून कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये ४ बीएचके फ्लॅटदेखील आहे. त्याव्यतिरिक्त गुरगावमध्ये त्यांच्या मुलीसह संयुक्त मालकी असलेल्या फ्लॅटमध्ये त्यांच्यानावे ५६ टक्के हिस्सा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फाळणीपूर्वीपासूनची त्यांची पिढीजात जमीनदेखील त्यांच्यानावे आहे.