चंद्रपूर : अभियंता दिनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी शासकीय कामकाज सोडून थेट जिल्हा परिषदेचे शासकीय विश्रामगृह वसंत भवन गाठले. अभियंत्यांनी तेथे दारू पार्टीचे आयोजन केले होते. आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकला आणि अभियंत्यांचा हा कारनामा उघडकीस आणला. या घटनेचा व्हिडिओ आम आदमी पक्षाने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी याबाबतची माहिती मिळताच युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखले, शहर संघटन मंत्री संतोष बोपचे आणि स्थानिक पत्रकारांसह वसंत भवन येथे धाव घेतली. यावेळी आठ अभियंते दारूपार्टी करताना आढळून आले. जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक सोयी मिळत नाहीत, रस्ते खड्ड्यात गेले आहेत, ग्रामीण रुग्णालयांत औषधे नाहीत, पिण्याच्या पाण्याची, विजेची मोठी समस्या आहे. अशा स्थितीत शासकीय कामकाज सोडून दारूचे पेग रिचवणे शासकीय अभियंत्यांसाठी अशोभनीय असून अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, एकीकडे जिल्ह्यातील जनता समस्यांनी त्रस्त आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेचे अभियंते शासकीय वेळेत दारू पार्टी करत आहेत, हे गैरजबाबदार वर्तन आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी आमची ठाम मागणी आहे.
आम आदमी पक्षाने यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य अभियंता विवेक पेंडे यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांना निलंबित करण्यास भाग पाडले होते. याला आठ दिवस लोटत नाही तोच आम आदमी पक्षाने हा दुसरा गंभीर प्रकार उघडकीस आणला. यामुळे जिल्ह्यातील भ्रष्ट अभियंत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम आदमी पक्ष पुढील काळातही अशा भ्रष्टाचारविरोधी कारवाया सुरू ठेवणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिला आहे.