नागपूर: सतराव्या रोजगार मेळाव्याचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. देशभरासह नागपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. तर पंतप्रधान मोदींनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संदेशही दिला. या कार्यक्रमात एक अनोखा प्रकार घडला. यावेळी भारतीय टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी पंतप्रधान मोदी आणि गडकरींसमोर या कार्यक्रमात एकमेकिंशी भिडल्या. याचे निमित्त होते एक खुर्ची. याचा एक व्हीडीओही समोर आला असून काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया…

शुक्रवारी १७ व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरी पत्रे वाटली. ते म्हणाले, या वर्षी, प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीने तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणला आहे. उत्सवाच्या दरम्यान कायमस्वरूपी नोकरीसाठी नियुक्ती पत्र मिळणे हा उत्सवाचा दुहेरी आनंद आणि यशाचा दुहेरी आनंद आहे. देशभरातील ५१,००० हून अधिक तरुणांना आज हा आनंद मिळाला आहे. तुम्हाला राष्ट्रीय सेवेत सक्रिय योगदान देण्याची संधी मिळाली आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, आज, तुम्हाला केवळ सरकारी नोकरी मिळाली नाही तर तुम्हाला राष्ट्रीय सेवेत सक्रिय योगदान देण्याची संधीही मिळाली आहे. मला विश्वास आहे की तुम्ही या भावनेने काम कराल. प्रामाणिकपणा आणि सचोटीने, तुम्ही भारताच्या भविष्यासाठी चांगल्या व्यवस्था निर्माण करण्यात तुमची भूमिका बजावाल. पंतप्रधान पुढे म्हणाले, तुमच्या सर्व कुटुंबांमध्ये असणारा आनंद मी अनुभवू शकतो. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मनापासून अभिनंदन करतो. आयुष्यातील या नवीन सुरुवातीसाठी मी शुभेच्छा देतो. तुमचा उत्साह आणि कठोर परिश्रम करण्याची तुमची क्षमता स्वप्नांच्या सत्यात उतरण्यापासून जन्माला येते.

कार्यक्रमात नेमके काय घडले?

नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या बाजूला असलेल्या सोप्यावर टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी बसलेल्या होत्या. मात्र, या सोप्यावर केवळ एकच अधिकारी बसण्याची व्यवस्था होती. त्यांच्या नावाची पाटीही टेबलवर ठेवण्यात आली होती. यावेळी झाले असे ही टपाल सेवेतील एका महिला अधिकारी यांची बदली दक्षिण भारतातील एक शहरात झाली. मात्र, अद्यापही त्यांनी मुख्यालय सोडलेले नाही. त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या एक महिला अधिकारी रूजू झाल्या आहेत. मात्र, रोजगार मेळाव्यामध्ये या दोन्ही महिला अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी एकाच खर्चीवर दोघीही बसल्या. यावेळी त्या दोघींमध्ये जुंपली. एकमेंना धक्के मारून त्या खर्चीवरून उठवत होत्या. केंद्रीय मंत्र्यांसमोर हा प्रकार घडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता.