बुलढाणा: शासन प्रशासनाकडे तक्रारी केल्या, आंदोलने केली. मात्र आपल्या मागणीकडे असलेले दुर्लक्ष कायम असल्याने दोघा युवकांनी गणराज्य दिनी अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. यंत्रणा वा जिल्हा प्रशासन सामान्यांच्या मागण्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आपला जहाल संताप व्यक्त केला.

जिल्ह्यातील अवैध दारूविक्री बंद करा या मागणीसाठी साठेगाव (ता. सिंदखेड राजा) येथील रावसाहेब उत्तम झोटे याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्महदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याचा प्रयत्न हाणून पाडला. सिंदखेडराजा तालुक्यासह जिल्ह्यातील अवैध दारूविक्री बंद करा या मागणीसाठी त्याने सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. मात्र काहीच कारवाई न झाल्याने त्याने मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी टोकाचा प्रयत्न केला.

हेही वाचा – वर्धा : देव तारी त्याला कोण मारी! माजी आमदारांची कार उलटली, सुदैवाने…

हेही वाचा – नागपूर : गर्भवती पत्नीला भेटून घरी परतणाऱ्या व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राचार्यांच्या हिटलरशाहीविरुद्ध आत्मदहन

दरम्यान मेहकर ‘आयटीआय’ च्या प्राचार्या व्ही. बी. शिरसाट यांच्या मनमानी व गैरव्यवहाराच्या निषेधार्थ दिवठाणा (ता चिखली) येथील युवकाने अंगावर इंधन ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र साध्या वेशातील पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. अविनाश घेवंदे असे या उच्चशिक्षित युवकाचे नाव आहे. मागील १ ऑक्टोबर २०१९ ते २३ मे २०२३ दरम्यान मेहकर ‘आयटीआय’ मध्ये तासिका तत्वावर निदेशक म्हणून ते कार्यरत होते. मात्र प्राचार्यानी मनमानी निर्णय घेत घेवंदेसह चौघांना कामावरून काढून टाकले. तसेच नियम न पाळता चौघांची नियुक्ती करून टाकली. याविरुद्ध त्यानी मेहकर येथे १ ते ४ जानेवारी २०२४ दरम्यान उपोषण केले. अमरावती स्थित सहसंचालक (व्यवसाय शिक्षण) यांनी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. प्राचार्यांच्या विविध ठिकाणी गैरव्यवहाराचा अहवाल संचालक मुंबईकडे असताना कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचा घेवंदे यांचा आरोप आहे. त्यामुळे कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दोघांना बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.