केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची पाहणी

नागपूर : दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी वाढली असली तरी मागील दोन वर्षांच्या तुलनेत ती कमीच आहे. पर्यावरणाविषयी  जनजागृती आणि दिवाळीतील पावसामुळे हा परिणाम झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या रात्री देशभरातील १०४ शहरांमधील  हवेतील प्रदूषणाची पातळी मोजली. यात देशातील पाच शहरांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून आले.

दिवाळीत फटाके फोडल्यावर या शहरातील हवेची गुणवत्ता अतिधोकादायक स्थितीत पोहोचली आहे, तर हवेची गुणवत्ता अतिशय वाईट असलेल्या शहरांमध्ये देशातील २३ शहरे आहे. हवा गुणवत्तेची स्थिती वाईट असणाऱ्या शहरांमध्ये १७ शहरांचा समावेश आहे. हवा गुणवत्ता मध्यम असणाऱ्या शहरांमध्ये १८ शहरे आहेत. हवा गुणवत्ता समाधानकारक असणाऱ्या शहरांमध्ये २३ शहरे असून प्रदूषणाचा खूपच परिणाम जाणवणाऱ्यांमध्ये दहा शहरांचा समावेश आहे.

हवेच्या प्रदूषणात सर्वात मोठा घटक पर्टिक्युलेट मॅटर(अतिसूक्ष्म धूलिकण) आहे. २.५ मायक्रॉनपेक्षा कमी आणि त्यानंतर दहा मायक्रॉनपर्यंत धुळीचे कण असतात. याशिवाय सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया, शिसे, आर्सेनिक, निकोल, ओझोन, कार्बन मोनोक्साईड अशा विविध घटकांचा प्रदूषणात समावेश असतो.

महाराष्ट्रातील शहरांची स्थिती

हवा गुणवत्ता स्थिती समाधानकारक असणाऱ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील अमरावती, अंकलेश्वर, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर  या शहरांचा समावेश आहे. मध्यम स्थिती असणाऱ्या शहरांमध्ये चंद्रपूर, कल्याण, मुंबई, नवी मुंबई, पुणे या शहरांचा समावेश आहे. समाधानकारक स्थिती असणाऱ्या शहरांमध्ये भिवंडीचा समावेश आहे.

‘ते’ धुके नव्हे प्रदूषणच

गेल्या दोन दिवसांपासून नागपूरकर धुक्याची रात्र अनुभवत आहेत, पण हे धुके(फॉग) नाही. तर फटाक्यांचा धूर आणि वातावरणातील ओलावा यातून तयार झालेले प्रदूषणाचे धुके(स्मॉग) आहेत.

यंदा नागपूरसह विदर्भातील अनेक भागांकडे पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवली, पण अखेरच्या क्षणी बरसणारा पाऊस दिवाळीपर्यंत कायम आहे. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. मात्र तो पावसाळी गारवा आहे. दिवाळीच्या दिवशीही पावसाने शहरात धुमाकूळ घातल्याने फटाके फोडण्याचे प्रमाण कमी होईल असे वाटत होते. मात्र, उपराजधानीकरांनी पावसाने उसंत घेताच फायदा घेत फटाके फोडलेच. पाऊस मिश्रित थंडीत हवा आणि अशा वातावरणात फोडलेल्या फटाक्यांचा धूर जमिनीच्या पातळीवरच राहतो. थंडीमुळे वातावरणातील ओलावा आणि फटाक्यांचा धूर एकत्रित होऊन शहरात सध्या प्रदूषणाचे धुके तयार होत आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना हवामानाचे हे गणित उलगडले नाही. प्रदूषणाच्या धुक्याला ते थंडीचे धुके समजून त्याचा आनंद घेत आहेत. रात्रीच्या वेळी या प्रदूषणयुक्त धुक्याचा आनंद घेण्यासाठी ते जातात, पण ते आरोग्यासाठी अधिक धोक्याचे असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, अस्थमाच्या रुग्णांसाठी हे धुके अतिशय धोकादायक आहे. या धुक्यामुळे डोळ्यात जळजळ होते. २.५ पीएम म्हणजेच अतिसूक्ष्म धूलिकण नाकातून आत जाऊन त्याचा त्रास उद्भवू शकतो. थंडीमुळे पडणाऱ्या धुक्याचा दुष्परिणाम होत नाही, पण प्रदूषणाचे धुके थंडीच्या धुक्यासारखे दिसत असले तरी ते अतिशय घातक असतात. त्यातून कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे घातक वायू बाहेर पडत आहेत. त्यामुळे थंडीचे धुके समजून नागरिकांनी त्याचा आनंद घेऊ नये, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञांनी केले आहे.