अमरावती : सुरूवातीला मित्रपक्षांना सोबत घ्यायचे आणि नंतर घात करून त्यांना संपवणे हाच आजवरचा भाजपचा कार्यक्रम राहिला आहे, अशी टीका माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, आतापर्यंत भाजपने जितके मित्रपक्ष तयार केले त्यांना संपवले. जशा प्रकारे वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला तसेच भाजप मित्रपक्षांच्या डोक्यावर पाय ठेवतो. मित्र पक्षांचे खच्चीकरण करत मुंबई हातात घेण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे. मित्र पक्षाने जागरूक राहिले पाहिजे. एकवेळ विरोधकांच्या हाती सत्ता गेली तरी चालेल पण भाजप जर असे वागत असेल तर तशाच पद्धतीने उत्तर देणे गरजेचे आहे.

बच्चू कडू म्हणाले, दिव्यांगांचे पगार, लाडक्या बहिणींचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. राज्यात कुठलेही आर्थिक संकट नसताना ते दाखवत वेगळे काम करण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून सुरू आहे. पैसा नाही म्हणत कंत्राटदारांना पैसे दिले जात नाही. संजय गांधी, लाडकी बहीण, अपंगाचे पैसे तीन-तीन महिने भेटत नाही. दुसरीकडे त्यांच्यात निकटचे जे कंत्राटदार आहेत त्यांचे देयके निघत आहेत. भाजपकडून अर्थकारण सुरू आहे. ‘आरएसएस’च्या विचारसरणीच्या लोकांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

निवडणूक म्हणजे धार्मिक युद्ध

बच्चू कडू म्हणाले, निवडणूक ही आता मुद्द्याची राहिलेली नाही ते एक मोठे धार्मिक युद्ध झाले आहे. प्रभागामध्ये देखील जाती-जातींमध्ये हे युद्ध सुरू झाले आहे. लोकशाहीमध्ये होणारे मतदान हे विकास आणि मुद्द्यापासून दूर गेलेले आहे, हे देशासाठी घातक आहे. चांगल्या कार्यकर्त्यांची १० टक्के लोक कदर करतात ९० टक्के लोक तसे करत नाही. पैसा खर्च करणाऱ्यांचा मागे लोक जात आहेत, असे चित्र दिसून येत आहे.

बच्चू कडू म्हणाले, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे म्हणत कार्यकर्त्यांना भावनिक करायचे आणि राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी द्यायची असे प्रकार केले जातात. पक्षाचे गुलाम असणाऱ्या लोकांमध्ये वैचारिक बांधिलकी राहिलेली नाही. ते फक्त पक्ष म्हणून काम करतात मग त्यांनी कोणीही उमेदवार दिला तर त्यांचे गुणगाण गातात. नवरा आमदार असतो आणि तो बायकोला नगराध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न करतो, ही चुकीची गोष्ट आहे. जर तिचे कर्तृत्व असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण फक्त घराणेशाही म्हणून हे अत्यंत चुकीचे आहे.