कांद्याच्या निर्यात बंदीवरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाची घोषणा केली आहे. मग, मेक इन इंडियात कांदा बसत नाही का? असा संतप्त सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे. ते विधानसभेत बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाची घोषणा केली आहे. मग, मेक इंडियात कांदा बसत नाही का? भारतातील प्रत्येक वस्तू बाहेर जाण्याबाबत मोठ्या गोष्टी करण्यात येतात. मात्र, कांद्यावर निर्यात बंदी लागू करण्यात येते. कांदा महाग झाला म्हणून कुणी मरत नाही.”

हेही वाचा : “मलिकांना एक आणि पटेलांना दुसरा न्याय का?” उद्धव ठाकरेंच्या सवालावर फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

“बापाबरोबर बेईमानी करायची की पक्षाबरोबर करायची?”

“केंद्र सरकारनं कांद्यावर ८०० डॉलरचे निर्यात शुल्क लावलं आहे. मी सरकारला पाठिंबा दिला असून, सत्तेत आहे. पण, बापाबरोबर बेईमानी करायची की पक्षाबरोबर करायची? माझ्या आईने सांगितलं, ‘पक्षाबरोबर बेईमानी केली, तरी चालेल, मात्र शेतकऱ्यांबरोबर बेईमानी करू नको,'” असं बच्चू कडूंनी म्हटलं.

हेही वाचा : “अजित पवारांना मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो अन्…”, भास्कर जाधवांचं भाजपाला आव्हान

“कांद्यानं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडलं होतं”

“निवडणूक समोर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कांद्याचे भाव वाढणार असल्याचं सरकारला माहिती होतं. कांद्यानं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडलं होतं. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी कांद्यावर निर्यात बंदी लागू केली होती. म्हणजे इंदिरा गांधी, अटबिहारी वाजपेयी ते आतापर्यंत कांद्यावर निर्यात बंदी लागूच आहे,” अशी खंत बच्चू कडूंनी व्यक्त केली.