राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या उपस्थितीनं गाजला. मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विरोधी पक्षानं भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्ता येते जाते म्हणत मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवत अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सवाल केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“देश महत्वाचा आहेच, मग नवाब मलिकांना एक न्याय आणि प्रफुल्ल पटेलांना दुसरा न्याय का? प्रफुल्ल पटेलांबाबतही पत्र लिहा. या पत्राच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“…तर त्याच्यावरही तोच न्याय लागला पाहिजे”

यावर देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले, “नवाब मलिकांवर आरोप, त्यांच्यासारखं तुरूंग कुणी भोगलं असेल अथवा तशी परिस्थिती कुणाचीही असेल, तर त्याच्यावरही तोच न्याय लागला पाहिजे, हे सांगतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“उद्धव ठाकरे विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात”

‘आम्ही धारावीकरांचा विकास मागतोय, त्यांच्या मित्रांचा विकास नाही’, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लगावला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, ” धारावीचं पहिलं कंत्राट अडाणींना नव्हतं. पहिलं कंत्रात रद्द करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या सरकारनं केलं. उद्धव ठाकरे विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात. धारावीच्या लोकांना घर मिळू नये, अशी उद्धव ठाकरेंची नीती दिसत आहे. त्याअंतर्गतच उद्धव ठाकरेंचं काम चालू आहे.”