अमरावती : भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. या वक्तव्यावरुन मोठा राजकीय वाद उफाळल्यानंतर आता लोणीकर यांनी देखील माफी मागितली आहे. माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. ‘एक्स’ या समाज माध्यमांवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आमच्या घामाच्या पैशावर देश चालतो, अन्नधान्य आम्ही पिकवतो, आमच्या मतावर तू व तुझा बाप पण निवडून येतो. अन आमचा बाप काढतो. तुझा बाप असेल मोदी… जगाचा बाप शेतकरी आहे”, अशा शब्दात बच्चू कडू यांनी लोणीकर यांच्यावर टीका केली आहे.
बच्चू कडू यांनी गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका घेतली आहे. गुरूकूंज मोझरी येथे त्यांनी नुकतेच आठवडाभर अन्नत्याग आंदोलन केले. सरकारने आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले असले, तरी त्यांची संघर्षांची भूमिका कायम आहे.त्यातच आता बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यामुळे बच्चू कडू यांना सरकारवर टीकची आयती संधी मिळाली आहे. बच्चू कडू यांनी लोणीकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना एक छायाचित्र देखील प्रसारीत केले आहे.
बबनराव लोणीकर नेमके काय म्हणाले?
“सोशल मीडियावर चार-पाच कार्टी असतात, त्यांचा मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाचे पेन्शन बबनराव लोणीकरने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६ हजार रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या आई, बहीण आणि पत्नीला लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आणि तुझ्या पायावरची चप्पल आमच्यामुळेच. हातातले ते मोबाईलचे डबडे आमच्यामुळे आणि आमचेच घेतो आणि आमच्यावरच तंगड्या वर करतो, असे वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले होते.
या वक्तव्यावरुन मोठा राजकीय वाद उफाळल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोणीकर यांना सुनावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मी सुद्धा स्पष्ट करतो. पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही नेत्याला, कुठल्याही आमदाराला, कुठल्याही खासदाराला, जनप्रतिनिधींना बबनराव लोणीकर ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने बोलायचा अधिकार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.