अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. काल शुक्रवारी महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आपण कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे सांगून बच्चू कडूंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे उपोषण मंडपातून निघून जात असताना बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनी केलेल्या दोन मिनिटांच्या भाषणाने सारेच जण गहिवरले. नयना कडू यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. बावनकुळे यांनी अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर देश शोकमय असताना बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले, त्यावर नयना कडू यांनी प्रत्यूत्तर दिले.

नयना कडू म्हणाल्या, “चंद्रशेखर बावनकुळे यांना एक संदेश देते, तो शासनाच्या कानी पोहचवावा. अहमदाबाद येथील विमान अपघाताने हा करोडोचा देश जसा हादरला. तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने मनापासून हादरला पाहिजे. बच्चू कडू हे सातत्याने आंदोलन करतात, हे शासनाला माहित आहे. बच्चू कडू तुम्ही केव्हाही आंदोलन करू शकता, असे बावनकुळे या ठिकाणी म्हणालेही. पण, एक लक्षात घ्या. कोण्याही आंदोलकाला आंदोलन करणे हे सोपे नसते. देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस उपवास करावा आणि आमच्या अमृता वहिनींची काय परिस्थिती होईल, हे लक्षात घ्या. मला शासनाला एक सांगायचे आहे. कोणताही पक्ष असो, तो सत्तेत गेल्यावर मायबाप शेतकऱ्यांसाठी एकत्र यावे, नियोजन करावे. कापूस उत्पादक शेतकरी असो किंवा कांदा उत्पादक असो, त्याला आनंदाने जगता यावे, अशी व्यवस्था निर्माण करण्याची अक्कल कुठल्याही सरकारला राहिली नाही का, असा प्रश्न पडतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नयना कडू म्हणाल्या, “सरकारने एकदा काहीतरी शेतीचे नियोजन ठरवावे, जेणेकरून आंदोलन करण्याची वेळच येऊ नये. सरकारने उपोषण करणाऱ्या पन्नास आंदोलकांकडे पहावे. बच्चू कडू पाचव्यांदा अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. जो कार्यकर्ता आंदोलन करतो, त्याचे कुटुंब मरत असते. कोणतेही शासन असेल. स्वत:ची गेंड्याची कातडी बाजूला ठेवा. सर्व पक्षांनी जात-पात दूर ठेवा आणि शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी धोरण ठरवा आणि त्याची अंमलबजावणी करा, ही विनंती आहे. यापुढे बच्चू कडू यांना अन्नत्याग करायला भाग पाडणार असाल, तर खबरदार. प्रहारचे कार्यकर्ते संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल”, असा इशारा नयना कडू यांनी दिला.