अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि आंदोलन मागे घेण्यात आले. यादरम्यान, बच्चू कडू यांनी सुमारे २५ वर्षांपुर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लिहिलेले पत्र चर्चेत आले आहे. गेल्या अडीच दशकांत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काहीच बदल झाला नाही, हे त्यांच्या पत्रातून लक्षात येते.
१९९५ सालची विधानसभा शिवसेना-भाजपा युतीने जिंकली. प्रथमच शिवसेना-भ़ाजपा युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मनोहर जोशींना मिळाला होता.
बच्चू कडू यांनी त्यावेळी लिहिलेल्या पत्रातील मजकूर असा :
प्रति, सन्मानीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख,
कला नगर, मुंबई<br>आपणास त्रिवार जयमहाराष्ट्र
महोदय,
आम्ही शिवसेना, तालुका शाखा चांदूर बाजार तर्फे नम्र निवेदन करतो की, आपल्या अतिशय महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे या महाराष्ट्रात शिवसेनेचे राज्य आले आणि शिवसैनिकांना अतिशय मोलाचा दिवस पहावयाला मिळाला. आम्ही सर्व ग्रामीण भागातील काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं शिवसेनेत गेल्या दहा वर्षांपासून श्रम, रक्त सांडून निष्ठेने काम करीत आहोत. परंतु दोन-अडीच वर्षांच्या शिवशाही सरकार मध्ये शहरातील उड्डाणपूल, भल्यामोठ्या इमारती, झुणकाभाकर केंद्र, इतर बाबाची पचनपूर्ती झाली परंतू प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी दिलेले वचन अजून पर्यंत पूर्णत्वास गेले नाही. याचे मोठे दुःख होत आहे.
शेतकऱ्यांच्या घरोघरी ७/१२, (तो कधीच मिळाला नाही). २४ तासांत कापसाचा चुकारा (परंतु ६-६ महिने पैसा मिळत नाहीत. या मालाचे कुठे संरक्षण नाही उलट इंदिरा विकास पत्र (बाँड) मार्फत दहा टक्के कपात करुन शेतकऱ्यांवर खोल कुऱ्हाडीचा घाव युती शासन करीत आहे. नोव्हेंबर / डिसेंबर मध्ये शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. कपाशीचे बोंड झाडाला सडले, कापूस बाहेर निघाला नाही, संत्रा गेला, ज्वारी कणसाला वरचेवर कोंब फुटले, तुरीला शेंगीचा पत्ता नाही, सोयाबीन इतर पिके मार्केट आणि शेतात सडली अशी दयनीय अवस्था असताना पिक विमा दूरच, उलट सक्तीने कर्ज वसूल केल्या जात आहे. ही बाब शिवसैनिकांसाठी दुर्दैवी आहे.
सिमेंटच्या जंगलात निर्माण झालेल्या मा. मुख्यमंत्र्यांना जणू शेतकरी दिसेनासा झाला की काय, असे भासत आहे. शेतकऱ्यांना संकटातून वाचवण्यासाठी आपण शिवरायांसारखे धावून याल अशी अपेक्षा करतो ! नाही तर युती पेक्षा काँग्रेस बरी असे म्हणायची वेळ येवू नये, तसेच शिवसैनिक हे बहुसंख्य शेतकरी आहेत, याची जाण म्हणून लक्ष घालावे, ही नम्र विनंती.
आपला शिवसैनिक
बच्चू कडू, सभापती, पंचायत समिती, चांदुर बाजार.
