अकोला : अपंगांच्या अडचणींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी ‘मंत्रालय अपंगांच्या दारी’ अभियान महत्वाचे ठरत आहे. हे अभियान या उपक्रमापुरतेच मर्यादित न ठेवता अंमलबजावणीत सातत्य ठेवावे, अशा शब्दात ‘अपंग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.

विविध प्रवर्गातील अपंगांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग अपंगांच्या दारी’ अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार किरण सरनाईक, जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा समाजकल्याण अधिकारी अनिल पुंड, सहायक आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते. या उपक्रमात शासनाच्या सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन निपटारा करण्यात आला व विविध योजनांच्या लाभाचे वितरणही करण्यात आले.

हेही वाचा >>> “भाजपच शिवसेना ठाकरे गट चालवतो…”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपाने खळबळ

ते म्हणाले, ‘अपंगांना प्राधान्याने घरकुले मिळवून देण्याबरोबरच अंत्योदय व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. अपंगांच्या सर्वेक्षणात अकोला जि. प.ला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. जिल्ह्यातील नागरी भागात विशेषत: नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातही सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे. जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडून पाच टक्के निधी खर्च होतो का? हे तपासावे. अपंगांना मिळणारे अर्थसाह्य नियमितपणे वेळेत मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत.’ कडू यांनी कार्यक्रमात उपस्थित अपंगांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व निपटारा करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. कार्यक्रमातील भाषणे व माहिती मूकबधीर बांधवांना सांकेतिक भाषा सहायकाद्वारे सांगण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा >>> “निवडणूक आयोगाचा पेपर फुटला”, सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, “मला भीती वाटतेय, काही तरी गोलमाल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपंगांना लाभाचे वितरण

४५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आवास योजना, कृत्रिम अवयव आदी विविध लाभांचे वितरण करण्यात आले. अपंग कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आदी विविध विभागांच्या ३८ कक्षांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याबरोबरच योजनांची माहितीही देण्यात आली. अपंग नोंदणीसाठीही स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आले होते.