नागपूर: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांचा एक नवीन गोंधळ समोर आला आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक सारेच सभ्रमात आले आहेत. यावर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार सीबीएसईच्या धर्तीवर एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत.

या नवीन अभ्यासक्रमात भाषा, गणित, इंग्रजी आणि ‘खेळू, करू, शिकू’ या विषयांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. या अंतर्गत, इंग्रजी विषयाच्या अध्ययन निष्पत्तींमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द, अक्षरे, त्यांचे उच्चार, कविता गायन, साध्या सूचना समजणे आणि स्वतःबद्दल बोलणे यासारख्या कौशल्यांचा समावेश आहे. मात्र, पाठ्यपुस्तकामध्ये फार मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकच कविता दिसून येतेय. ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ कवितेचे नाव आहे. यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईच्या धर्तीवर नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. मात्र, या नवीन पुस्तकांमध्ये ही कविता दोन्ही वर्गांमध्ये जशीच्या तशी समाविष्ट करण्यात आल्याने यामागील हेतू आणि नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दोन वेगवेगळ्या वर्गांसाठी एकच कविता समाविष्ट करणे यातून पाठ्यपुस्तक निर्मितीतील निष्काळजीपणा दिसून येतो. एका पालकाने सांगितले, पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेगळा असायला हवा. एकच कविता दोन्ही वर्गांत समाविष्ट करून मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मर्यादित होते. दुसऱ्या एका पालकाने प्रश्न उपस्थित केला की, ही कॉपी-पेस्टची चूक आहे.

फक्त चित्रात बदल?

‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही कविता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात पान क्रमांक २८ वर आहे. तर दुसरीच्या पाठ्यपुस्तकात तीच कविता पान क्रमांक १६ वर आहे. दोन्ही ठिकाणी कवितेचा मजकूर एकच आहे. केवळ त्यासोबतच्या चित्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. या कवितेची पुनरावृत्ती दोन्ही वर्गांमध्ये का झाली?, याबाबत बालभारतीकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या वर्गाची कविता चुकून पहिल्या वर्गात देण्यात आली असावी असा अंदाज आहे. मात्र, शासनाने हा निर्णय घेतल्यामुळे आमकडे पर्याय नाही. आम्हाला कविता शिकवावीच लागेल. पहिल्या वर्गाच्या अभ्यासक्रमानुसार ही कविता कठीण असल्याचेही शिक्षकांचे मत आहे.