यवतमाळ : अलिकडच्या काळापर्यंत भाजप, शिवसेनेविरोधात अभिनव आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारे प्रदेश काँग्रेसचे माजी संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी अखेर भाजपचे कमळ हातात घेण्याचा निर्णय जाहीर केला.
काँग्रेसमधून बाहेर पडताना पवार यांनी पक्षातील स्थानिक ज्येष्ठ नेत्यांवर जातीयवादाचा ठपका ठेवला. पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे कितीही सामाजिक न्यायाच्या गोष्टी करत असले तरी, राज्यात त्यांच्या विचारांना काहीच किंमत नाही. राज्यात काँग्रेसची सूत्रे विशिष्ट जातीच्याच लोकांच्या हातात असल्याने पक्षात बहुजनांना न्याय मिळत नाही, असा आरोप देवानंद पवार यांनी केला आहे. राज्यात दीड कोटी बंजारा समाज आहे. या समाजाचे दोन मुख्यमंत्री होऊन गेले मात्र आज काँग्रेसमध्ये बंजारा समाजाला सन्मानजनक वागणूक आणि महत्त्वाच्या ठिकाणी संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
निवडणुकीपूर्वी मागासवर्गीय व बहुजनांच्या सामाजिक न्यायाच्या गप्पा हाणायच्या आणि प्रत्यक्षात मात्र बहुजनांच्या नेतृत्वास संधीच द्यायची नाही, त्यांचे नेतृत्च दडपून टाकायचे, असा हुकूमशाही प्रकार काँग्रेसमध्ये सुरू असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.
देवानंद पवार हे सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे स्वीय सहाय्यक होते. त्या दरम्यान त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली आणि ते जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर सभापती झाले. मधल्या काळात मोघे यांच्यासोबत बिनसल्यानंतर त्यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले यांचा हात धरला. पटोले यांचे विश्वासू सहकारी म्हणून पवार यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात बस्तान बसविले.
प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करत असताना जिल्ह्यात मोघे, ठाकरे या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांविरोधात वातावरण निर्मिती केली. त्याची परिणिती म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी पक्षात ज्येष्ठ विरूद्ध दुसऱ्या फळीतील नेत्यांमधील संषर्घ चव्हाट्यावर आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संघर्षाची दखल घेतली. मात्र तोडगा निघाला नाही. या संघर्षावेळीच देवानंद पवार आणि दुसऱ्या फळीतील अन्य काही काँग्रेस नेते भाजपात जाणार अशी चर्चा होती. अखेर देवानंद पवार यांनी पुढाकार घेवून काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या हिंदुत्वाचा मार्ग पत्कारला. येत्या १३ सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देवानंद पवार भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.
भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी देवानंद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मुंबई येथे पुढील वाटचाल, पद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील तिकीट वाटप आदींबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्यानंतर पवार यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसमधील अनेक मोठे नेतेही लवकरच भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे सुतोवाच देवानंद पवार यांनी दिले.