नागपूर : सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या कणाहीन नेतृत्वामुळे या विभागावर त्यांची पकड राहिलेली नाही. याचाच प्रत्यय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यासह बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वारे समतादुतांच्या कार्यशाळेत बेभान डान्स करत असल्याची व्हायरल झालेली चित्रफीत होय. यावेळी वक्ते वसंत हंकारेदेखील उपस्थित होते.

बार्टीच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असताना, बार्टीच्या महासंचालकांकडून गोविंद, बोलो, हरि गोपाल बोलो या गाण्यावर बेभान नृत्य केल्याची चित्रफीत सर्वत्र फिरत आहे. विशेष म्हणजे राज्यभरातून आलेल्या समतादुतांनादेखील बेभान डान्स करायला लावल्याचे यात दिसत आहे. समतादुतांच्या या कार्यशाळेचा उद्देश त्यांना भारतीय संविधानांचा अभ्यास आणि महामानवांच्या विचाराने त्यांना प्रेरित करून प्रशिक्षित करणे हा होता. मात्र या विभागात मनमानी सुरू असून, त्याचाच कित्ता महासंचालकांनी गिरवत, बेभान डान्स केल्याचे समोर आल्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – चंद्रपूर : डिझेलसाठी पैसे नसल्याने गर्भवतीसह रुग्णवाहिका तासभर पेट्रोल पंपावरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सामाजिक न्याय विभाग असल्याने त्यांना या विभागाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. परिणामी सचिव सुमंत भांगे, सुनील वारे यांची या विभागात चांगलीच चलती आहे. या विभागावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. त्यामुळे बार्टीच्या महासंचालकांचा बेभान डान्स त्याचाच परिपाक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी या विभागातील तक्रारीची गंभीर दखल घेऊन या विभागाची झाडाझडती घ्यावी अशी मागणी आंबेडकरी समाजातून होत आहे.