नागपूर : लाडक्या बहिणीच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. चुकीच्या पद्धतीने ज्यांनी “लाडक्या बहिणी”ने लाभ घेतले आहे, त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही, हे सरकारने या आधीच स्पष्ट केले आहे. मात्र महिलांचे पैसे जर पुरुषांनी घेतले असेल, तर गुन्हा दाखल केला पाहिजे, पैसेही वसूल केले पाहिजे. अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेवर पुरुषांनी हात मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल १४ हजार २९८ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी थोडेथाडके नाही तर २१ कोटींहून अधिक रक्कमेवर हात मारल्याने या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केलीये. राज्यभरातून यावर विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता कारवाईची मागणी केली आहे.
सरकारने या संदर्भात आधीच भूमिका स्पष्ट केली असून चुकीच्या पद्धतीने ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतले आहे, त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही. पण महिलांचे पैसे जर पुरुषांनी घेतले असतील तर गुन्हा दाखल व्हायला हवा. पैसेही वसूल केले पाहिजे, असे बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ही योजना राज्यातील गरीब महिलांसाठी होती. अनेक पुरुषांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे महिला म्हणून नोंदणी करून आर्थिक लाभ घेतला. शासन या सर्व १४ हजार,२९८ पुरुषांकडून पैसे वसूल करणार असून, गरज पडल्यास गुन्हेही दाखल करण्यात येतील. ही योजना केवळ पात्र महिला लाभार्थींनाच मिळण्यास पात्र आहे; नवीन नियमावलीही लवकरच लागू होणार आहे.
मंत्रीमंडळातील बदल करण्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातले अधिकार त्या पक्षातील नेत्यांचा आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र, माझ्यासह मंत्रिमंडळातील सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की जनतेच्या मनात लोकप्रतिनिधी बद्दल काही वाईटपणा निर्माण होईल, जनतेच्या मनात लोकप्रतिनिधी बद्दल मत खराब होतील, असे वागणे योग्य नाही. यासाठी आम्ही सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.