नागपूर: शिवसेना सोडून भाजपने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले तेंव्हा उध्दव ठाकरे यांच्या हिटलिस्टवर भाजप आणि या पक्षाचे नेते अर्थात देवेंद्र फडणवीस होते. उध्वव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला तितक्याच तिखटपणे प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे पारपाडत असत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते अधिक तत्परतेने हे काम करीत असत. अनेकदा ठाकरे यांच्यावर टीका करताना बावनकुळे यांची जिभ घसरली. पण म्हणतात राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपसोबत त्यांची जवळिक वाढत असल्याचे दिसून येते.
देवेंद्र फडणवीस यांच्या जन्म दिनी उध्वव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देताना फडणवीस यांचे कौतुक केले. त्यामुळे कालपर्यंत उध्वव ठाकरे यांच्याविषयी कठोर शब्दांचा वापर करणा-या बावनकुळे यांचीही भाषा बदलली. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ठाकरेंचा उल्लेख ‘ उध्वजी’ असा करीत त्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेचे दाखले दिले.
बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक परंपराच ही आहे की वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या कामाचं, केलेल्या कर्तुत्वाचा कौतुक केले जाते. मला वाटतं उद्धवजींनी देवेंद्रजींच्या कामाबद्दल, व्हीजन बद्दल, देवेंद्रजींच्या २०२९ च्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेबद्दल उल्लेख केला असावा.त्यामुळे संकल्पाला खऱ्या अर्थाने जोड मिळाली आहे आणि उद्धव ठाकरेंनी केलेले कौतुक या राज्याच्या राजकारणाकरिता आणि सर्वच पक्षाकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे, सर्वच पक्षाने भूमिका घेतली पाहिजे की कर्तृत्ववान व्यक्तीचे कौतुक करणं या महाराष्ट्राच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे बावनकुळे म्हणाले.
जन्मदिवसाच्या किंवा वाढदिवसाच्या कौतुक हे कुठे राजकीय घडामोडी नसते, एक प्रोत्साहन असते, याकडे त्यांनी लक्ष्य वधले.