भंडारा : स्वतःच्या मालकीच्या घरावर एका मायलेकाने अनधिकृत ताबा घेतल्याची तक्रार एका तक्रारकर्त्याने लाखनी पोलीस ठाण्यात केली होती. सदर घरावर पुन्हा ताबा मिळवून देण्याच्या बदल्यात २० हजार रुपयांची मागणी एका पोलीस हवालदाराने तक्रारकर्त्याकडे केली.अखेर आज लाचेचा पहिला हफ्ता स्वीकार करण्यासाठी आलेल्या या लाचखोर हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. राजेश नीलकंठराव भजने ( वय ४९) रा. समर्थ नगर, मुरमाडी असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे.
तक्रारदार यांनी सन २०१८ मध्ये लाखनी येथे एक घर खरेदी केले होते. मात्र, कालांतराने ते नागपूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी राहण्यास गेले. १७ एप्रिल २०२५ रोजी एक महिला व तिचा मुलगा यांनी तक्रारकर्त्याच्या लाखनी येथील घराचे कुलूप तोडून त्याचा ताबा घेतला. या मायलेकांच्या विरोधात तक्रारदाराने पोलीस ठाणे लाखनी येथे तक्रार दिली. त्या अनुषंगाने महिला व तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात महिला व तिच्या मुलास घरातून बाहेर काढून सदर घराचा ताबा तक्रारदार यांना देण्याकरिता पोलीस हवालदार राजेश भजने याने तक्रारदाराला २० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याचा पहिला हफ्ता ५००० रुपयांची लाच भजने याने मागितल्याची तक्रार २२ एप्रिल रोजी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
त्या अनुषंगाने सापळा रचण्यात आला. आज १४ मे रोजी रक्कम घेण्यास आल्यानंतर हवालदार राजेश भजने याला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाचेची मागणी केल्यामुळे आरोपी पोलीस हवालदार राजेश भजने याला ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.