भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी येथील कॅनरा बँकेच्या शाखेत काही अज्ञात चोरट्यांनी एक कोटीहून अधिक रकमेची लूट केली असून चोर फरार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कॅनरा बँकेच्या शाखेत महाव्यवस्थापक गणेश भाऊजी सातपुते (३३) लखमापूर बोरी यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीतासावंगी येथील कॅनरा बँकेच्या शाखेतील चिखला येथून १७ ते १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते सकाळी साडेसात वाजता वाजता दरम्यान सामानासह १ कोटी ५८ लक्ष १२ हजार ९४४ एवढी रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.

चोरट्यांनी बँकेचे कुलूप तोडून २७ हजार रुपये किमतीचे ९ सीसीटीव्ही कॅमेरे, सुमारे ४ हजार रुपये किमतीचे डीव्हीआर मशीन, सुमारे ४ हजार रुपये किमतीचे १ मॉनिटरसह स्ट्राँग रूममधून १ कोटी ५८ लक्ष १२ हजार ९४४ रुपये रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्याने तिथून पळ काढला.

भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५ (ई) आणि ३३१ (४) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे करीत आहेत.