भंडारा : तुमसर तालुक्यातील एका बारमध्ये काल मोठा राडा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत काही गुंडांनी चक्क पोलीस नायकासह त्याच्या मित्राला मारहाण केली. तुमसर तालुक्यात एका बारमध्ये हाणामारीची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलीस नायकालाच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमसर तालुक्यातील मिटेवानी गावात असणाऱ्या आस्था बारमध्ये संबंधित प्रकार समोर आला आहे.

संबंधित घटना ही रविवारी उशिरा रात्री घडली. खाली पडलेला मोबाईल का उचललास? असे म्हणून किरकोळ वादातून उफाळलेल्या या बार कांडाने रक्तरंजित वळण घेतले. यावेळी वाहतूक पोलीस नायक राकेश पटले आणि त्यांचा मित्र दुर्गेश तांडेकर या दोघांना दोन गुंडांनी चांगलेच हाणले. त्यामुळे दोघे जखमी झाले आहेत. आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोघे आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

नेमकं घडलं तरी काय?

पोलीस नायक राजेश पटले हे त्यांचा मित्र दुर्गेश तांडेकर यांच्यासह मिटवानीच्या आस्था बारमध्ये मद्यपान करत होते. दरम्यान, बारमध्ये दिनेश राठोड नावाच्या व्यक्तीचा मोबाईल खाली पडला. पटले यांनी तो मोबाईल उचलताच, “मोबाईल का उचलला?” या क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. हा वाद चिघळत गेला आणि आरोपींनी काचाचे ग्लास फोडून थेट पोलीस नायक पटले यांच्या डोक्यावर हल्ला केला.आपल्या मित्रावर हल्ला झाल्याचे बघताच मध्यस्थीला आलेल्या तांडेकर यांच्यावरही आरोपींनी हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. यात दोघ रक्तबंबाळ झाले. यानंतर दोघांना तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तांडेकरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.