भंडारा : तीन वर्षांपूर्वी एका तरुणाचा खून केल्या प्रकरणी आणि हत्येला प्रवृत्त करण्याच्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा अचानक बेशुद्ध पडून मृत्यू झाला. जिल्हा कारागृहाच्या आवारात ही घटना घडली. मृत कैद्यांचे नाव गंगाधर निखारे (४२) असे आहे, तो पद्मा वॉर्ड, पवनी येथील रहिवासी आहे. हृदयविकाराच्या झटक्याने गंगाधरचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तथापि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण कळेल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

तहसीलदार भंडारा यांच्या उपस्थितीत पंचनामा झाल्यानंतर मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरला पाठवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी, २० जूनला दुपारी ३.३५ वाजता तुरुंगाच्या बॅरेकसमोरील व्हरांड्यात चालत असताना तो बेशुद्ध पडला. जिल्हा कारागृह रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेले तुरुंग कर्मचारी आनंद खर्चे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पूनम कुंभारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. कारागृहात आरोपीचा कारागृहात बेशुद्ध पडून मृत्यू झाल्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी अधिक माहिती घेत आहेत.

तीन वर्षांपासून कारागृहात

सुमारे ३ वर्षापूर्वी घडलेल्या एका खून प्रकरणात भादंविच्या कलम ३०२ (खून) आणि १०९ (खून करण्यास प्रवृत्त करणे) अंतर्गत गंगाधरला १० सप्टेंबर २०२२ रोजी न्यायालयाच्या आदेशाने भंडारा जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो शिक्षा भोगत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय होते प्रकरण

वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा देशी कट्ट्यातून गोळी झाडून गंगाधरने खून केला होता. ३ सप्टेंबर २०२२ रोजी भंडारा शहराच्या मध्यभागी असलेल्या हेडगेवार चौकातील स्वर्गीय अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात जुन्या वादातून गंगाधरने ही हत्या केली होती. अतुल वंजारी वय ३०, रा. गणेशपुर असे मृतकाचे नाव होते. गंगाधर निखारे हा उच्चशिक्षित असून तासिका प्राध्यापक म्हणून कार्यरत होता.