बुलढाणा : आजच्या संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्पर्धेच्या युगात बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जुन्या परंपरा, उत्सव, संस्कृती लोप पावत चालल्या आहेत. ‘केजी वन’पासून दप्तरांचे जड ओझे आणि शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धेत मुलांचे बालपण हरवले आहे! शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी घातक भ्रमणध्वनीवरील ‘गेम’मुळे बालमंडळी मैदानाकडे येत नाहीत. असाच शहरी तर सोडाच पण ग्रामीण भागातूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर असलेला एक उत्सव म्हणजे भुलाबाई. भुलाबाई उत्सवाची परंपरा बुलढाणा जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कशीबशी टिकून आहे.

भुलाबाई उत्सव हा विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील महिला, मुलींचा एक पारंपरिक सण. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यावर भाद्रपद पौर्णिमेपासून भुलाबाईची स्थापना केली जाते. हा सण कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. या उत्सवात भुलाबाई ही पाहुणी म्हणून एका घरात येते आणि या काळात टिपऱ्या खेळणे, पारंपरिक गाणी म्हणणे व प्रसाद वाटणे, असे कार्यक्रम केले जात. ‘पहिली ग पुजाबाई देवा देवा’, ‘कारल्याची बी पेर ग सुनबाई, मग जा आपल्या माहेरा’, ‘भाद्रपदाचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला’, ‘यादवराया राणी रुसून बैसली कैसी’, ‘भाद्रपदाचा महिना आला, पार्वती बोलें शंकराला चला हो माझ्या माहेरा’, आदी पारंपरिक गीते गायली जायची. दररोज एक खाऊ करायचा तो मैत्रिणींनी ओळखायचा, शेवटच्या दिवशी कोजागिरीला ३२ खाऊंचा प्रसाद, असा थाट राहायचा. मात्र, आता हा उत्सव हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

जिल्हा परिषदत शाळेत भुलाबाई…

ही परंपरा, उत्सव जतन करण्याचा वसा बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद शाळेने अनेक वर्षापासून घेतला व कायम राखला आहे. याही वर्षी शाळेतील सर्व शिक्षिकांनी सहभागी होत उत्सव साजरा केला. दप्तरमुक्त शाळा या विशेष उपक्रमांतर्गत साजरा करण्यात आलेल्या पारंपरिक कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींमध्येदेखील मोठा उत्साह पाहायला मिळाला. भुलाबाईची विविध गाणी, टिपऱ्याचा नाद, एकंदरीत विद्यार्थिनींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाईंचे विसर्जन करण्यात आल्यावर उत्सवाची सांगता होणार आहे.