लोकसत्ता टीम
अकोला : आगामी काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे लक्ष्य ठेवून भाजपने तयारी सुरू केली. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून भाजपने मोर्चेबांधणी केली आहे.
अकोला शहरात भाजपने ४८२ बूथ गठीत केले असून मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीत जुन्या-नव्यांचा मेळ साधण्यात आला आहे. भाजपने संघटनात्मक बांधणी करून राज्यभर मंडळ अध्यक्ष नियुक्त केले आहेत. अकोला महानगरमध्ये सात मंडळ असून त्यांची निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने घेण्यात आली.
यातून मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये खोलेश्वर मध्य मंडळ अध्यक्षपदी नितेश पाली, रेल्वे स्टेशन मंडळ अध्यक्षपदी नितीन राऊत, पूर्व मंडळ अध्यक्षपदी संदीप गावंडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. डाबकी रोड अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक तुषार भिरड, अमोल गीते, गोरक्षण रोड अध्यक्षपदी रणजीत खेडकर, मलकापूर खडकी रोड मंडळ अध्यक्षपदी गोपाल मुळे यांची निवड करण्यात आली आहे.
महानगरात एकूण ७७६ सभासद सक्रिय असून ४८२ बूथ गठीत करण्यात आले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये नव्या मंडळ अध्यक्षांच्या नेतृत्वात १०० टक्के यश मिळेल, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांनी व्यक्त केला.
सत्ता आणि संघटनेमधील महत्त्वाचा घटक
भारतीय जनता पक्षात लोकशाही आहे. संविधानानुसार पक्षाची कार्यपद्धती चालते. समाजातील सर्व घटकांना विकास करण्याचे पक्षाचे ध्येय धोरणे आहेत. नवीन सर्वांना सोबत घेऊन पक्ष विस्तारासोबत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता आणि संघटनेमधील महत्त्वाचा घटक म्हणून मंडळ प्रमुख कार्य करतील, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.
अकोला जिल्ह्यात दहाऐवजी १७ मंडळाची निर्मिती
अकोला जिल्ह्यात दहाऐवजी १७ मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. याची निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने सुरू असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील तीन मंडळ तयार करण्यात आले असून त्यापैकी दोन मंडळाच्या निवडणुका अविरोध झाल्या आहे. चोहोट्टा बाजार मंडळाच्या अध्यक्षपदी विठ्ठल वाकोडे यांची एक मताने निवड करण्यात आली. या मंडळामध्ये एकूण ५९ बूथ असून शक्ती केंद्र १७ आहेत. सक्रिय सभासद १५१, पोच समिती ५१ झाल्या आहे. इतर मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया देखील लवकरच होणार असल्याची माहिती देण्यात आली.