लोकसत्ता टीम

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीला जोर आला असून पश्चिम विदर्भातील मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह १५ फेब्रुवारीला अकोला शहरात डेरेदाखल दाखल होणार आहेत. भाजपसह शिंदे गटाचे खासदार असलेल्या पाच मतदारसंघाचा ते आढावा घेणार असल्याची माहिती आहे.

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. त्यानंतर राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिका, नगर पालिकांच्या रखडलेल्या निवडणुका देखील लागू शकतात. या निवडणुकांच्या वर्षासाठी प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी केली. नेत्यांसह इच्छूकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. निवडणुकांच्या अगोदरच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे, हे पक्ष व नेत्यांचे लक्ष्य आहे. निवडणुकीसाठी जुळवाजुळव व तळागाळातून मोर्चेबांधणी केली जात आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पश्चिम विदर्भातील भाजपचा गड म्हणून ओळख असलेला अकोला लोकसभा मतदारसंघात देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह येणार आहेत. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम व वर्धा लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा ते घेणार आहेत. पक्षाच्या संचलन समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन ते भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह २० संघटनमंत्री, विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर आदी उपस्थित राहतील.

आणखी वाचा-वर्धा : कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात पावसाचे आगमन, खुर्च्यांची छत्री करीत श्रोत्यांचे पलायन; पाच हजार खुर्च्या गायब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेसाठी सुमारे वर्षभर अगोदरपासूनच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली. पश्चिम विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड आहे. विभागात भाजपचे अकोल्यातून संजय धोत्रे एकमेव खासदार आहेत. गेल्या साडेतीन दशकांपासून लोकसभेच्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता भाजपने आपले वर्चस्व अबाधित राखले. खा. संजय धोत्रे प्रकृती अस्वास्थामुळे सक्रिय राजकारणापासून सध्या दूर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. लोकसभेची उमेदवारी धोत्रे कुटुंबात दिली जाते की इतर दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो, यावरून काथ्थाकूट सुरू आहे. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.