वर्धा : राज्यातील नगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होताच घडामोडीना वेग आला आहे. सर्वाधिक नाट्यमय घटना सत्ताधारी भाजपमध्ये घडत असल्याचे दिसून येत आहे. पद महिला राखीव असूनही २०, २५ अर्ज येत असतील तर निवडायचे कसे व कुणास, अश्या पेचात भाजप धुरीण पडले आहे.
संघटना सर्वोच्च मानणाऱ्या भाजपने मुलाखत घेत निवड करण्यासाठी जिल्हा कोअर ग्रुप तयार केला. पण त्यात यायला व मुलाखत घ्यायला चक्क आमदाराच तयार नाही, असा तिढा निर्माण झाला. खरे तर शहराचा नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी ही सर्वस्वी आमदाराची. म्हणून त्याचा से महत्वाचा. तोच या प्रक्रियेपासून दूर राहणार असेल तर कौल घ्यायचा कसा, हा प्रश्न आला आणि बाब थेट मुंबईत पोहचली. अफलातून तोडगा आणि आमदार मुलाखत घेण्यास तयार. काल शुक्रवारी रात्री ११ पर्यंत ही खलबते चालली.
जिल्ह्यातील सहाही नगराध्यक्ष भाजपचे असण्याचा मावळत्या पालिकेतील यशाचा ठेवा. तो पाहून यावेळी पण तसेच यश राखण्याचा दबाव नेत्यांवर आला आहे. सत्ता आपलीच येणार म्हणून भाजप समर्थक ईच्छुक उमेदवार बाशिंग बांधून बसलेले आणि त्यांची झुंबड उडालेली. यात निवडायचे कसे, शिफारस कुणाची करायची आणि मग उर्वरितांचे वैर कसे दूर करणार, असा प्रश्न पडलेल्या भाजप आमदारांनी मग मुलाखत सोपस्कारापासून दूर राहण्याचा निर्णय घेऊन टाकला. हा निर्णय निवडणूक प्रमुखांना अडचणीचा ठरला. वर्धा जिल्ह्यासाठी माजी खासदार रामदास तडस यांना निवडणूक प्रमुख तर पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांना प्रभारी म्हणून प्रदेशने नेमले. सोबत आजी, माजी जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारी आहेत. सायंकाळी उशीरा बोलतांना तडस म्हणाले की आम्ही दोघे व जिल्हाध्यक्ष असे तिघे मुलाखती घेणार. पण आणखी कोणास यात सोबत घ्यायचे याचा निर्णय आमच्यावरच सोडण्यात आला आहे.
चार विधानसभेचे व एक विधान परिषदेचा असे पाच आमदार असल्याने त्यांची भूमिका विजय मिळवून देण्यात सर्वात मोठी राहणार असल्याने त्यांना इछूकांच्या मुलाखती घेण्यात सहभागी करून घेण्याचे ठरले. पण त्यांचा चक्क नकार. माझ्या गावातील एकाची तर सोडा पण तिघांच्या नावांची जरी शिफारस केली तर उर्वरित इच्छुकांना कसे समजविणार, असा त्यांचा प्रश्न. नाराज उमेदवार आमदारासच दोष देणार आणि निवडणूक कठीण करून टाकणार. म्हणून दूर राहलेलेच बरे. असा आमदार पवित्रा पाहून ही बाब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दारी गेली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत घेतले. आमदार या प्रक्रियेत राहणारच, असे ठरले. अशी माहिती एका नेत्याने रात्री आठ वाजता दिली. सर्व आमदारांना कार्यालय प्रमुख श्रीधर देशमुख यांनी शनिवारी होणाऱ्या मुलाखत उपक्रमात सहभागी होण्याचा निरोप दिला. त्यांनी यांस दुजोरा दिला.
आमदार राजेश बकाने म्हणाले की रात्रीच असा निरोप मिळाला. आज सकाळी ११ पासून या मुलाखतीस सुरवात होणार आहे. एकाच दिवसात सहाही पालिका अध्यक्षपदासाठी ईच्छुक उमेदवारांची मुलाखत आटोपणार. प्रत्येकी एक तास देत सोपस्कार संपणार. प्रथम तीन नावांचे पॅनल बंद लिफाफ्यात मुंबईत जाणार. आमदार तयार झाले आहेत. पण त्यांची डोकेदुखी राहू नये म्हणून तोडगा काढण्यात आला. काय ? तर ज्यावेळी आमदार संबंधित पालिकेची मुलाखत होणार त्यावेळी तो आमदार उपस्थित राहणार नाही. आमदाराच्या गावातील मुलाखती तो आमदार सोडून इतर घेणार. म्हणजे शिफारस करण्यात आपल्या आमदाराचा रोल नाही, असे चित्र उमटणार. रात्री ११ वाजता तोडगा निघाला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. आमच्या अनुपस्थितीत मुलाखती घ्या आणि नंतर एकट्यात आमचे मत घ्या, असे आमदार म्हणणे होते. पण त्यास कोअर ग्रुप तयार नव्हता. आम्ही तरी आमच्यावरच खापर कां फोडून घ्यायचे, असा त्यांचा सवाल.
