अमरावती : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना समाज माध्यमावरील रीलच्या माध्यमातून अश्लील शब्दात शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी संबंधित खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाने केली आहे. उभय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले.
आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली नाही, तर सर्व महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. नवनीत राणा यांना अश्लील शिवीगाळ करुन गंभीर आणि जीवितास धोका निर्माण करणारी धमकी देण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे वक्तव्य हे केवळ अशोभनीय आणि दंडनीयच नव्हे, तर एका महिला लोकप्रतिनिधीच्या सुरक्षिततेला थेट आव्हान देणारे आहे.
यामधून सामाजिक वातावरणात तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाज माध्यमाचा गैरवापर करून माजी खासदारांविरुद्ध हेतुपुरस्सर द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, तसेच त्यांच्या सोशल मीडिया खात्यांची सखोल चौकशी करण्यात यावी.
संबंधित समाज माध्यमावरील पोस्ट व अकाउंटवर त्वरित तांत्रिक तपासणी व पुरावे संकलित करावे, नवनीत रवी राणा यांना तातडीने आवश्यक पोलिस संरक्षण उपलब्ध करून देणे, अशा प्रकारच्या गंभीर धमक्या रोखण्यासाठी विशेष सायबर यंत्रणेमार्फत सतर्क नजर ठेवण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
अशा प्रकारच्या घटनांवर तातडीने आणि ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर याचे गंभीर परिणाम भविष्यात समाजव्यवस्थेवर व कायदा-सुव्यवस्थेवर होऊ शकतात. त्यामुळे आपण या प्रकरणात कठोर कारवाई करावी. तसेच या नराधमाला भरचौकात चोप देण्यात यावा. जेणे करुन भविष्यात कोणत्याही महिला लोकप्रतिनिधी व कोणत्याच सामान्य महिलांच्या बाबतीत समाज माध्यमावर वक्तव्य व टिपण्णी कोणीही करणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी भाजपचे आमदार प्रवीण तायडे, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी नगरसेवक सुनील काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.