अमरावती : आगामी काळात महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत त्यांना उमेदवारही मिळणार नाही, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, गुरुवारी येथे केला.

२०१९ मध्ये विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी बावनकुळे अमरावतीत आले होते. त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही, ते आता भाजपमध्ये येत आहेत. आगामी काळात आघाडीतील मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे आघाडीत कुणी शिल्लक राहणार नाहीत. तत्कालीन आघाडी सरकारने वैधानिक मंडळे बंद करून विकास थांबवला होता. ती मंडळे आमच्या सरकारने पुन्हा सुरू केल्याने विकासाचा अनुशेष भरून निघेल. आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ व विधानसभेत २०० हून अधिक जागा जिंकू, असा दावा करतानाच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे दिवस संपल्याची टीका केली. सुप्रिया सुळे यांना आता शरद पवारांच्या नावानेही मते मिळणार नाहीत, असाही दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीला संपवण्याचे काम थेट बारामतीमधूनच सुरू झाले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, भाजपची काय तयारी आहे? यावर बोलताना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा दाखला देत बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला ५१ टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा केला.

मंत्रिमंडळ विस्तार, ‘ईडी’ चौकशी आणि पंकजा मुंडेंबाबत भाष्य टाळले

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजी आहे. ते अस्वस्थ आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी विस्तार केव्हा होईल, या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र टाळले. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांच्या संदर्भातही बोलण्यास त्यांनी नकार दिला. महाविकास आघाडीतील काही नेते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची ‘ईडी’मार्फत होणारी चौकशी का थांबली? या प्रश्नावरही स्पष्ट बोलण्याचे त्यांनी टाळले. ‘ईडी’ स्वतंत्र यंत्रणा आहे, यंत्रणेचे अधिकारी निर्णय घेतात, असे ते म्हणाले.