वर्धा : आर्वी मतदारसंघातील निवडणूक काळातील असंख्य घडामोडीपैकी सर्वात महत्वाची घडामोड आज घडली. भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पत्रकार परिषद बोलावून आपल्या भावना व्यक्त करून टाकल्या.ते म्हणाले, मी आता राजकीय संन्यास घेणार. कोणत्याही पक्षात जाणार नाही. सामाजिक कार्य करणार. १९८३ पासून भाजप कार्य केले. गावागावात पक्ष उभा केला. संघटना बांधली. २००९ मध्ये आमदार झालो. २०१४ मध्ये पडलो पण राज्यात आमची सत्ता आल्याने आर्वीत खूप विकासकामे केली. २०१९ मध्ये निवडून आलो. गत अडीच वर्षात पुन्हा नव्याने विविध कामे केली. पक्ष मलाच तिकीट देईल, अशी खात्री होती. पण नाकरण्यात आली. खरं तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, देवेंद्र फडणवीस म्हणत होते की दादाराव तिकीट तुम्हालाच.

उमेदवार सुमित वानखेडे यांनी सहा महिन्यापूर्वी मला भेटून सांगितले होते की मी नाही तुम्हीच उमेदवार.तरी पण पक्षाने दिलेल्या उमेदवारसाठी २३ सभा घेतल्या. ठिकठिकाणी फिरलो. मतदान झाले आणि माझ्यावर संशय घेणे सुरू झाले.पक्षातील काही नेते कुजबुज करू लागले. तेव्हा वाटले की हेचि फळ काय मम् तपाला. त्यामुळे वाटते की अर्ज मागे नसता घेतला, उभाच राहलो असतो तर बरं झाले असते. असो. मला जे कबूल केले होते, ते पण नकोच.विधान परिषद कबूल केली होती. पण काय भरवसा. म्हणून झाले ते झाले. ७१ वर्ष झाले. आता थांबण्याचा निर्णय घेतला, असा उदवेग केचे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा…पंतप्रधान मोदी, राहूल गांधींची सभा झालेल्या या मतदारसंघात झाले ८१ टक्के विक्रमी मतदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केचे यांनी स्पष्ट आरोप करण्याचे नाकारले. मात्र आता काहीही भाष्य करणार नाही, असे ते लोकसत्ता सोबत बोलतांना म्हणाले. जवळपास ४२ वर्ष आर्वी मतदारसंघात भाजप म्हणजेच केचे हे समीकरण रूढ झाले होते. जिल्हा परिषदेत पक्ष बहुमतात असतांना केचे यांच्या गटास अध्यक्ष व उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. ते म्हणेल ती पूर्वदिशा. यातूनच नवा नेता तयार होत नसल्याचे दिसून आल्यावर ज्येष्ठ नेत्यांनी २०१९ च्या निवडणुकीत सुधीर दिवे यांना उमेदवारी देण्याचा डाव मांडला होता. पण केचे यांनी ही एक शेवटची संधी द्या, असे म्हटल्याचे भाजप नेते सांगत. म्हणून यावेळी केचे नाहीच. अशी भूमिका आली. पण केचे यांनी असे काही बोललो नसल्याचे स्पष्ट करीत दावेदारी कायम ठेवली. ते बाजूला होत नाही म्हणून मग थेट अहमदाबाद येथे अमित शहा यांच्या दरबारात त्यांना हजर करीत अर्ज मागे घेण्याचे फर्मान झाले. ते मान्य करीत व प्रदेश उपाध्यक्षपद घेऊन केचे यांनी वानखेडे यांचा प्रचार सूरू केला. पण आज अखेर त्यांनी भावनावश होत राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहिर करून टाकला. पुढे काय, हा त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न मात्र अनुत्तरीत राहला आहे.