Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : वर्धा : एकीकडे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापूढे आंदोलन करण्याचा निर्धार तर दुसरीकडे त्याच आंदोलनास पाठिंबा देणारा भाजप आमदार. तेही पोलिसांना हुलकावणी देत वाट काढली आणि रात्री अखेर या भाजप आमदाराने बच्चू कडू यांना गाठलेच. हा पक्षद्रोह नव्हे का, तर यावर आमदार म्हणतात की मी प्रथम शेतकरी पुत्र व नंतर अन्य काही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासन यांची परीक्षा घेणारे आंदोलन माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्नावर छेडले आहे. वर्धा जिल्हा ओलांडून त्यांचा महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा जेव्हा काल मंगळवारी बुटीबोरी येथे पोहचला तेव्हा चहू बाजूने कोंडी उडाली. रस्ते जाम व सगळे ठप्प. कडू व त्यांना समर्थन देणारे अन्य संघटना नेते रस्त्यावर.
कोंडी फुटणार केव्हा हा सामान्य प्रश्न उपस्थित झाला तेव्हाच सरकारचे निमंत्रण ठोकरून लावण्याचा व रेल रोको आंदोलन करण्याचा ईशारा कडू देऊन चुकले. ही सरकारसाठी चांगलीच गंभीर बाब ठरावी. त्यामुळे पक्ष सरकारच्या बाजूने उभा असे चित्र उभे झाले पण त्यात सरकारविरोधी म्हणावी अशी भूमिका खुद्द भाजप आमदा्रांकडून पुढे आली आणि बच्चू कडू पण थक्क झाल्याची चर्चा सूरू झाली.
हे भाजप आमदार कोण ? तर देवळीचे राजेश बकाने. त्यांनी काल मध्यरात्री बच्चू कडू यांची भेट घेतली. हमीभावाने खरेदी व कर्जमुक्ती या दोन मागण्यास पाठिंबा असल्याचे बकाने यांनी कडू यांना सांगितले. ते म्हणतात की माझ्या वर्धा जिल्ह्यातील शेतकरी उपाशी या आंदोलनात सहभागी असल्याचे कळले. म्हणून भेटण्यास गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. मग बच्चू कडू यांना भेटलो. तुम्हास पाठिंबा असल्याचे म्हटले.तसेही आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. हमीभाव व कर्जमुक्ती यांस मी शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाठिंबा आहे. शेतकरी प्रथम. पक्ष काही शेतकऱ्यांच्या विरोधात नाही.मुख्यमंत्री त्यांच्याशी सहमत. शासनाच्या सरकारने ८ हजार कोटी आधी पाठविले. व आता १० हजार कोटी पाठवणार.शेतकऱ्यांच्या मी पाठ्ठीशी, अशी भूमिका आमदार बकाने मांडतात. ते इतक्या गर्दीत वाट काढून कसे पोहचले, या प्रश्नावर हसत उत्तर देत ते म्हणाले की मी मला माझ्या शेतकरी बांधवांना भेटायचेच होते म्हणून चक्क रॉंग साईड ने गाडी टाकून एकटाच निघालो होतो.
या संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते सचिन डाफे हे आमदार बकाने यांची प्रशंसा सोशल मीडियातून करतात. हे मुद्दे आमदार बकाने यांनी विधिमंडळ अधिवेशनात मांडणार असल्याचे नमूद केले आहे. मी भाजप आमदार नंतर व प्रथम शेतकरी पुत्र. त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना समजल्या, याबद्दल त्यांचे जाहीर आभार. रात्री उशीरा अशी भेट घेण्यासाठी आमदार बकाने धावले, हे महत्वाचे.
