वर्धा:भाजपच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात विदर्भातील भाजपच्या झाडून सर्व आमदार, खासदारांनी हजेरी लावणे अपेक्षित होते. तसे झालेही. अपवाद वगळता ही नेतेमंडळी तसेच विदर्भातील सर्व मंत्री सेवाग्रामात हजर झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे विश्वासू मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अशोक उईके, आकाश फुंडकर तसेच आयोजन जबाबदारी असलेले डॉ. पंकज भोयर जातीने हजर. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पूर्व नियोजित दिल्ली भेटीमुळे अनुपस्थित राहले.मात्र एक परिचित चेहरा दिसत नसल्याचे भाजप पदाधिकारी खाजगी चर्चेत बोलत होते. कोण हा नेता ?
तर विदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून परिचित व आमदार सुधीर मूनगंटीवार हे गैरहजर राहले. यावेळी मंत्रिमंडळात समावेश होवू नं शकलेल्या मूनगंटीवार यांनी काही कृतीतून त्याबद्दल नाराजी पण नोंदविली होती. पण पक्षाचा महत्वपूर्ण मेळावा असतांना त्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. ती बाब सर्वांना खटकली. मात्र मुख्यमंत्री काही नेते पूर्वसूचना देत गैरहजर राहल्याचे स्पष्टीकरण देते झाले. तसे तर फडणवीस यांना मूनगंटीवार यांचे नाव घेण्याची संधी पण होती. पण त्यांनी टाळले.
विदर्भातील विविध विकास कामांचा पाढा वाचत असतांना मुख्यमंत्री म्हणाले की आज आपण ज्या चरखा भवनात बसलो आहे, ते भवन पण आपल्याच कार्यकाळात बांधल्या गेले. खरे तर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना सुधीर मूनगंटीवार यांचाच हा पेट प्रोजेक्ट होता. जगातील सर्वात मोठा चरखा सेवाग्रामात लावणार, अशी घोषणा करीत त्यांनी हे काम पूर्ण केले होते. पण हा संदर्भ फडणवीस यांनी टाळला, असे एका मूनगंटीवार समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक नेत्याने निदर्शनास आणले.
फडणवीस हजर तर मूनगंटीवार गैरहजर अशी बाब दोनवेळा ईथे घडल्याचा इतिहास आहे. उपमुख्यमंत्री असतांना दोनदा ईथे आलेल्या फडणवीस यांच्या भेटीवेळी त्यावेळी पालकमंत्री असलेले मूनगंटीवार उपस्थित नव्हते. सदर प्रतिनिधिने याबाबत विचारणा केल्यावर मूनगंटीवर उत्तरले की वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. मी अन्य कामात असल्याने येवू शकलो नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. तसे वृत्त लोकसत्तात प्रकाशित झाले होते. यावेळी मंत्रिमंडळात मूनगंटीवार यांचा समावेश नं झाल्याने ही बाब चांगलीच चर्चेत आली होती. त्यावर माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की मूनगंटीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आहे. ते मंत्री नसले तरी त्यांच्या पक्षातील जबाबदाऱ्या व त्यांची दृष्टी प्रशासनासाठी अमूल्य आहे.
मंत्रीपद नं मिळालेल्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही विशेष जबाबदारी देण्याचे नियोजन केले आहे असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिले होते. मात्र तरीही अधिवेशनाच्या या पहिल्याच दिवशी मूनगंटीवार यांनी अनुपस्थित राहून नाराजी नोंदविल्याची चर्चा झालीच. तसेच सेवाग्रामच्या भाजप मेळाव्यातील त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली.