नागपूर : पश्चिम नागपुरातील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरुद्ध लढत आहेत. कुणबी, मुस्लीम आणि उत्तर भारतीय मतदारांची मते निर्णायक असलेल्या या मतदारसंघात भाजपला काँग्रेसकडून कडवी झुंज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत ३७,२१५ मतांची आघाडी घेतली होती. २०१९ मध्येही २७, २५२ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. भाजपचे लोकसभेतील मताधिक्य कमी करून विजयासाठी आवश्यक मतेही ठाकरे यांनी मिळवली. या निवडणुकीत ठाकरे यांचा ६, ३६७ मतांनी विजय झाला होता.

हेही वाचा – नागपूर : मोदींच्या सभास्थळी पावसाचे पाणी, शिंदेंकडून मध्यरात्री पाहणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेच्या सलग दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघात प्राबल्य राखले. ठाकरे यांनी विधानसभेत बाजी उलटवली होती. आता हेच दोन्ही नेते समोरासमोर असल्याने या मतदारसंघात मतांची विभागणी कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेससाठी उत्तर नागपूरनंतर हाच मतदारसंघ मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी महत्वाचा आहे. गडकरी यांना मागील दोन्ही निवडणुकीप्रमाणे याहीवेळी आपले प्राबल्य सिद्ध करावे लागणार आहे. पश्चिम नागपुरात कुणबी, मुस्लीम, उत्तर भारतीय यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच बौद्ध, ख्रिश्चन आणि आदिवासींचेही मोठ्या प्रमाणात मतदान आहे. विकास ठाकरे यांनी गेल्या साडेचार वर्षांत आमदार म्हणून केलेली कामे आणि त्यांचा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सर्व समाज घटकांत चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे शहरातील या मतदारसंघात ही निवडणूक तुल्यबळ ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…

सहा महिन्यांत मतदारांचा कल बदलला

२०१९ च्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपने काँग्रेसला मागे टाकले होते. येथे भाजपने १,०२,९१६ मते तर काँग्रेसने ७५,६६४ मते घेतली होती. २०१९ च्या विधानसभेत मात्र काँग्रेसने बाजी मारली होती. विकास ठाकरे यांनी भाजपकडून हा मतदारसंघ खेचून आणला होता. काँग्रेसला ८३,२५२ मते तर भाजपला ७६,८८५ मते मिळाली होती. बसपाने ४,५९५ आणि वंचित बहुजन आघाडीने ६,५७३ मते मिळवली होती.