चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बहुसंख्य संचालकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. परिणामी शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच जिल्हा बँकेत भाजपची सत्ता आली. तीच रणनीती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपकडून अवलंबिली जाणार आहे.विजयाची हमी असलेल्या काँग्रेस तथा अन्य पक्षीय माजी नगरसेवकांना भाजपकडून थेट प्रवेशाचा प्रस्ताव देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे काँग्रेससोबतच भाजप वर्तुळातही अस्वस्थता आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे संजय डोंगरे, नंदा अल्लूरवार यांच्या गळ्यात दुपट्टा टाकून भाजप प्रवेश करवून घेतला. त्यानंतर रवींद्र शिंदे यांचाही मुंबईत भाजप प्रवेश घडवून आणत त्यांना बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान केले.
काँग्रेसचे बहुसंख्य संचालक भाजपच्या पाठीशी आहे. जिल्हा बँक निवडणुकीतील ही रणनीती आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद तथा पंचायत समिती निवडणुकीत वापरण्याचा डाव भाजपने आखला आहे. त्या दृष्टीने भाजप नेत्यांनी काम करण्यास सुरुवात केली आहे.
तुम्ही भाजपमध्ये प्रवेश घ्या, निवडणुकीच्या खर्चाचे आम्ही पाहू, असा निरोप काहींना देण्यात आला आहे. केवळ महापालिकाच नाही, तर जिल्हा परिषद सदस्यांनाही अशाच पद्धतीने प्रस्ताव देण्यात आले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना काहीही करून महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेत सत्ता मिळवाची आहे. त्या दृष्टीने भाजप नेत्यांनी काम सुरू केले आहे.