काटोलमध्ये पोटनिवडणुकीत भाजपची कसोटी

सहा महिन्यांसाठीच आमदारकी मिळणार असल्याने राजकीय नेत्यांमध्ये या पोटनिवडणुकीबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

सहा महिन्यांच्या आमदारकीसाठी नेतेही अनुत्सुक

आशीष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभेबरोबरच काटोल विधानसभा मतदारंसघातील पोटनिवडणूक होणार असून, हा मतदारसंघ कायम राखण्याकरिता भाजपने सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सहा महिन्यांसाठीच आमदारकी मिळणार असल्याने राजकीय नेत्यांमध्ये या पोटनिवडणुकीबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही.

काटोल हा राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा पारंपरिक मतदारसंघ. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आशीष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. भाजपमध्ये न रमल्याने आशीष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता पोटनिवडणूक होत असली तरी ते लढणार नाहीत.

गेल्या वर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने काटोलची निवडणूक पक्षाने गांभीर्याने घेण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे पारंपरिक बालेकिल्ला परत ताब्यात घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून होणार आहेत. विशेष म्हणजे, काटोल हा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो. ही जागा युतीत सेनेच्या वाटय़ाला आहे.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत काटोल या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे उमेदवार म्हणून डॉ. आशीष देशमुख यांनी त्यांचे काका व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. डॉ. आशीष देशमुख यांना ७० हजार ३४४ मते मिळाली होती, तर अनिल देशमुख यांना ६४ हजार हजार ७८७ मते मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र हरणे यांना १३ हजार ६४९ मते मिळाली होती. या विजयानंतर काटोलमध्ये पहिल्यांदा भाजपला आमदार मिळाला होता.  पक्षात महत्त्वाचे स्थान मिळत नसल्याने ते नाराज होते. त्यांनी स्वतंत्र विदर्भ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार पदाचा राजीनामा देऊन पक्षही सोडला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आशीष देशमुख यांनी पक्ष सोडल्यावर भाजपने या मतदारसंघात समन्वयक पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश ठाकरे यांना समन्वयक म्हणून नेमले. संघटनात्मक पातळीवर सक्षम असलेल्या ठाकरे यांनी अडचणीच्या काळात मतदारसंघात पक्षाची पडझड थांबवतानाच नव्याने बांधणीही सुरू केली. पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोद्दार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोटनिवडणुकीसाठी पक्षाची तयारी झाली असल्याचे सांगून साधारणत: २१ मार्चला उमेदवाराची घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

दुसरीकडे पराभवानंतरही अनिल देशमुख यांनी मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवला. वेगवेगळी आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते अनेक वेळा रस्त्यावरही उतरले.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुख स्वत: रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.

२०१४ मध्ये माजी मंत्री सुभाष झनक यांच्या निधनाने लोकसभेबरोबरच रिसोड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा लोकसभेत भाजप-शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते, पण विधानसभेत झनक यांचे पुत्र अमित हे विजयी झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjps test in the by election in katol