नागपूर : राजस्थान, गुजरातसहीत हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा ‘ब्लॅक ईगल’ काही महिन्यांपूर्वी नागपुरात आला आणि मांज्यामुळे त्याला एक पंख गमवावा लागला. मात्र, येथील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’मध्ये त्याच्यावर उपचार झाले आणि पुन्हा एकदा हा दुर्मिळ पक्षी उडण्यास सक्षम झाला. यावेळी या केंद्राची चमू तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी पायाला रिंग लावली. ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ मधून पायाला रिंग लावून नैसर्गिक अधिवासात मुक्त होणारा हा पहिलाच पक्षी आहे.

संक्रांतीच्या काळात रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात उंच झाडावर मांजामध्ये ‘ब्लॅक ईगल’ लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’च्या चमुने त्याला झाडावरून काढले तेव्हा जवळपास चार ते पाच इंच जखम त्याच्या पंखाला होती. मांजामुळे एक पंख पूर्णपणे कापला गेला होता. पशुवैद्यक डॉ. मयूर काटे, डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. पंकज थोरात, डॉ. स्मिता रामटेके, सिद्धांत मोरे यांनी त्याच्या पंखावर शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्यावर अतिदक्षता विभागात काळजी घेण्यात आली. जखम पूर्णपणे सुकल्यानंतर त्याला उडण्याच्या सरावासाठी ‘एविअरी’त (उपचारानंतर उडण्याच्या सरावासाठी तयार करण्यात आलेले जाळीचे दालन) सोडण्यात आले. तो परत नैसर्गिकरित्या उडण्यास सक्षम आहे हे तपासल्यानंतर प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांच्याशी संपर्क साधला व नैसर्गिक अधिवासात सोडण्याआधी पायाला ज्या नंबरच्या रिंग लावतात, त्या मागितल्या.

हेही वाचा – वाशिम जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद! तीन-चार दिवसांत पाऊस न आल्यास..

हेही वाचा – वातावरण बदलाचे जमिनीवर परिणाम; नागपूरच्या राष्ट्रीय संस्थेकडून राज्यातील पाच हजार गावांत संशोधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकांनी या रिंग घेऊन त्यांच्या शास्त्रज्ञांना पाठवले. त्यांनी व ट्रान्झिटच्या वैद्यकीय चमूने ‘ब्लॅक ईगल’ला ‘के-८१०१’ ही रिंग लावली. याचा फायदा पक्ष्यांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना होणार आहे. ‘ब्लॅक ईगल’ आपल्याकडे हिमालयातून थंडीच्या वेळी येतो आणि नंतर परतही जातो. हे या पक्ष्याचे नेहमीचे स्थलांतरण आहे. या पक्ष्याला ज्या ठिकाणाहून वाचवण्यात आले त्या रामदेवबाबा महाविद्यालयातूनच त्याला प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक विजय गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त करण्यात आले.