लोकसत्ता टीम

भंडारा: गावाजवळील विहिरीत आशा वर्करचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे उघडकीस आला. शालिनी चरणदास तिरपुडे, वय ५२ असे मृत आशा वर्करचे नाव आहे. २३ जून रोजी सकाळी बहीण सुनीता तिरपुडे ही झोपेतून उठल्यावर तिला शालिनी घरी दिसली नाही. शेजारी चौकशी केली असता तिथेही न दिसल्याने कामानिमित्त गेली असावी, असे समजून पोलीसात न कळविता ती घरीच राहिली. दरम्यान आज शनिवार २४ जून रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेतशिवारात गुरे चारण्यासाठी गेलेल्यांना विहिरीजवळ चप्पल व स्कार्फ दिसला.

गुराख्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता पाण्यावर महिलेचे प्रेत तरंगताना दिसले. त्यांनी पोलीस पाटील विरेंद्र रंगारी व करडी पोलीसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह विहिरीबाहेर काढला. यावेळी मृतक महिला ही शालीनी तिरपुडे असल्याची ओळख पटविण्यात आली. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनात हवालदार प्रफुल वालदे करीत आहेत.