लोकसत्ता टीम
बुलढाणा: आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जालना जिल्ह्यातील मराठा समाज बांधवावर अमानुष लाठीमार झाल्याचे बुलढाणा जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले. सकल मराठा समाजाने उद्या रविवारी बुलढाण्यात आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. तसेच बुलढाणा बंदचेही आवाहन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील लाठीमार प्रकरणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे आज पाहवयास मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा बाजी करून लाठीमारचा निषेध करण्यात आला. यावेळी माध्यमाशी बोलताना बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष विजय हिम्मतराव सावळे यांनी अमानुष घटनेचा तीव्र निषेध केला. सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती ऍड सावळे यांनी दिली. बुलढान्यात होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर सकल मराठा समाजाच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-“जालनाच्या घटनेमागे कोण हे लवकरच समोर येईल,” मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे विधान; म्हणाले…
यावेळी सुनील सपकाळ, डॉ शोन चिंचोले, सागर काळवाघे, अमोल रिंढे, सचिन परांडे, सुनील जवंजाळ, डी एस लहाने, अनुजा सावळे, राजेश हेलगे, दत्ता काकस आदी हजर होते. निदर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासनाला निवेदन पाठविण्यात आले.