बुलढाणा: यंदाच्या उन्हाळ्यात आज अखेर जिल्ह्यातील २१ ग्रामस्थांना उष्माघाताचा फटका बसला! सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. दिवसेंदिवस उन्हाळ्यातील तापमानात वाढ होत उन्हाची तीव्रता वाढतच आहे. अगदी बुलढाणा शहरासारख्या ‘शीतल’ शहरात एप्रिलमध्येच ताप मापकाचा पारा ४० डिग्री सेल्सियसपर्यंत जात असल्याचे यंदाही पहावयास मिळाले.

बुलढाणा तालुक्याच्या तुलनेत इतर १२ तालुक्यांचे तापमान जास्त असते. प्रामुख्याने घाटाखालील खामगाव, मलकापूर, शेगाव, जळगाव, संग्रामपूर तालुक्यातील तापमान ४२ डिग्रीच्या आसपास रेंगाळते. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या तापमानात दक्षता न घेणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताचा फटका बसतो.

हेही वाचा – “अब्दुल गफ्फार खान यांना गांधीनिष्ठेचे मोल चुकवावे लागले,” प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे मत; म्हणाले…

यंदा १ मार्च ते ९ मे २०२४ दरम्यान २१ ग्रामस्थांना याचा फटका बसल्याची नोंद आहे. यंदा तापमानाची तीव्रता जास्त असल्याने अगदी मार्च मध्येच उष्माघाताचा फटका बसल्याचे दिसून आले. शेगाव तालुक्यातील आडसूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात २७ मार्चला २ महिलांना भरती करण्यात आले. एप्रिल महिन्यात याचे प्रमाण वाढले असून मे मध्येही रुग्ण आढळून आले. ९ मे अखेर एकूण २१ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यामध्ये खामगाव तालुक्यातील ८, शेगाव ४, बुलढाणा १, मेहकर ५, लोणार १ आणि सिंदखेडराजा तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे.

महिलांचे लक्षणीय प्रमाण

दरम्यान या रुग्णात महिलांचे प्रमाण दुप्पट असल्याचे चित्र आहे. एकूण २१ पैकी १४ बाधित महिला असल्याची नोंद आहे.

हेही वाचा – यवतमाळ पोलिसांची नामी शक्कल अन् सावज अलगद जाळ्यात अडकले; दुचाकी चोरीचे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्षणे आणि दक्षता

दरम्यान सतत घाम येणे, अशक्तपणा आणि डोकेदुखी ही उष्माघाताची लक्षणे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे, तहान नसली तरी अर्ध्या तासाने पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच ‘ओआरएस’, घरघुती लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत यांचे सेवन, १२ ते ३ बाहेर जाण्याचे टाळणे, पातळ सुती कपड्यांचा वापर करावा असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. गरोदर महिलांनी जास्त काळजी घ्यावी.